ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. दोघांनाही 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सुरजेवाला म्हणाले, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र 1942 मध्ये स्थापन करण्यात आले होते. त्यावेळेस ब्रिटीश सरकारने दडपशाही करण्याचा प्रयत्न केला आणि आता मोदी सरकार ईडीचा वापर करत सूड उगवण्याचा प्रयत्न करत आहे. मनी लॉन्ड्रिंग किंवा मनी एक्सचेंजचा कोणताही पुरावा नाही. नॅशनल हेराल्ड प्रकरणात फक्त इक्वीटीमध्ये रूपांतरण किंवा कर्ज असल्याचे सांगत आम्ही घाबरून न जाता खंबीरपणे लढा देणार आहे.
सिंघवी म्हणाले, राहुल गांधी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. 8 जून पर्यंत परतल्यास ते चौकशीला सामोरे जातील, अन्यथा ईडीकडे ते वेळ मागतील. सोनिया गांधी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील.