कोट्यावधींचा घोटाळा करणाऱ्या कंपनीशी खासदाराचे कनेक्शन
वृत्तसंस्था/ कोलकाता
ईडीने आता पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांच्या विरोधात पाऊल उचलले आहे. एका संशयास्पद वित्तीय संस्थेचे संचालक राहिलेल्या नुसरत जहां यांना ईडीने चौकशीसाठी बोलाविले आहे. या कंपनीने ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात निवासी फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला आहे. नुसरत जहां या कंपनीत संचालक होती. तपास यंत्रणेने यासंबंधी 7 सेंस इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अन्य संचालक राकेश सिंह यांनाही चौकशीसाठी बोलाविले आहे.
नुसरत अन् राकेश सिंह यांना 12 सप्टेंबर रोजी कोलकाता येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.ईडीने याप्रकरणी यापूर्वच ईसीआयआर नेंदविला आहे. ईडीकडून नोंद गुन्ह्यानुसार 7 सेंस इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हे लिमिटेड कंपनीने गुंतवणुकदारांकडून कोट्यावधी रुपये जमविले, परंतु त्यांना अद्याप निवासी फ्लॅट पुरविलेले नाहीत.
सेवन सेन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून झालेल्या घोटाळ्यावेळी नुसरत कंपनीची संचालक होती. ईडीकडून याचसंबंधी नुसरत जहांची चौकशी केली जाणार आहे. संचालकपदी असताना नुसरतला कंपनीकडून झालेल्या आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती होती का हे ईडी जाणून घेणार आहे. नुसरतवर कंपनीकडून पैसे घेतल्याचाही आरोप आहे.
संबंधित कंपनीकडून कर्जाच्या स्वरुपात रक्कम स्वीकारली होती. मी कुठल्याही ाdरष्टाचारात सामील नाही. कंपनीकडून घेतलेले कर्ज मी व्याजासह फेडल्याचा दावा नुसरतने केला आहे. सेवन सेन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड विरोधात भाजप नेते संकुदेव पांडा यांनी ईडीकडे धाव घेतली होती. फ्लॅट विकण्याच्या नावावर मध्यमवर्गीयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप पांडा यांनी केला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक हे यापूर्वीच ईडीच्या रडारवर आहेत. तसेच ममता सरकारमध्ये मंत्री राहिलेलेले पार्थ चटर्जी समवेत अनेक नेते सध्या तुरुंगात आहेत. तर खासदार नुसरत जहां यांनाही ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याने पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसणार आहे.









