राहुल गांधींचा दावा ः दुष्प्रचार आणि खोटेपणा हा, भाजप-आरएसएसचा पाया असल्याची टीका
वायनाड / वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या तीन दिवसांच्या केरळ दौऱयावर आहेत. शनिवारी वायनाडला भेट दिल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दुष्प्रचार आणि खोटेपणा हा भाजप-आरएसएसचा पाया आहे. द्वेषाच्या आगीत देशाला हादरवणाऱया भाजप-आरएसएसचा इतिहास संपूर्ण भारताला माहीत आहे. त्यांनी कितीही तोडण्याचे राजकारण केले तरी भारताला जोडण्याचे काम काँग्रेस करत राहील, असे ते म्हणाले. तसेच ईडीने माझी पाच दिवस केलेली चौकशी ही माझ्यासाठी ‘मेडल’ (पदक) असल्याचा दावाही त्यांनी केला.
भाजपला असे वाटते की, पाच दिवस माझी चौकशी केल्यानंतर, 55-60 तास पुन्हा तोच प्रश्न विचारल्याने मला त्रास होईल आणि मी काळजीत पडेन. यापेक्षा मोठा विनोद असूच शकत नाही. राहुल म्हणाले की, जेव्हा माझी पाच दिवस चौकशी झाली तेव्हा मला प्रश्न पडला होता की, त्यांनी फक्त पाच दिवसच माझी चौकशी का केली? 10 दिवस का नाही? अशीही विचारणा त्यांनी केली. ईडीने पाच दिवस माझी चौकशी का केली? केरळच्या मुख्यमंत्र्यांची चौकशी का केली जात नाही? ईडी-सीबीआय आणि इतर एजन्सी असलेले सरकार त्यांचा केरळच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध वापर का करत नाही? असेही राहुल गांधी म्हणाले.
भाजप आणि आरएसएस आमची राज्यघटना हस्तगत करत आहेत. लोकांचा आवाज दाबला जात आहे. पण आम्ही घाबरत नाही, आम्ही त्यांना देशाची जडणघडण नष्ट करू देणार नाही. ते करत असलेल्या हिंसाचारावर आमचा विश्वास नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही ते आघात करत आहेत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. त्यांनी शनिवारी वायनाड या आपल्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला.









