वृत्तसंस्था/हैदराबाद
ईडीने काही ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म्सच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. तेलंगणात विजय देवरकोंडा, राणा दग्गुबाती आणि प्रकाश राज यासारख्या अभिनेत्यांसह काही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स तसेच युट्यूबर्स समवेत 24 जणांहून अधिक जणांच्या भूमिकेच्या पडताळणीसाठी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अवैध सट्टेबाज आणि जुगाराद्वारे कोट्यावधी रुपयांची ‘अवैध’ रक्कम मिळविल्याचा आरोप या कलाकारांवर आहे. ईडीने पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंद करण्यासाठी 5 राज्यांच्या पोलिसांकडून नेंद एफआयआरची दखल घेतली आहे.
ईडी प्रकरणात विजय देवरकोंडा, दग्गुबाती, मांचू लक्ष्मी, राज, निधी अग्रवाल, प्रणिता सुभाष, अनन्या नागल्ला, टीव्ही होस्ट श्रीमुखीसह स्थानिक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स आणि युट्युबर्स समवेत सुमारे 29 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जाहिरात शुल्क प्राप्त करण्याच्या बदल्यात ऑनलाइन सट्टेबाजी अॅप्सचे समर्थन या कलाकारांनी केले होते. संबंधित अॅप्स अन् उत्पादनांच्या अचूक कार्यप्रणालीची माहिती नव्हती. सट्टेबाजीसारख्या कुठलेही चुकीचे कृत्य किंवा अवैध कृत्यासाठी या प्लॅटफॉर्म्ससोबत स्वत:ला जोडले नसल्याचा दावा काही आरोपींनी केला आहे.









