वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हरियाणातील गुरुग्राममध्ये प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) 130 कोटी रुपयांचा बेकायदेशीर कॉलसेंटर घोटाळ्याचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणी या बेकायदा कॉलसेंटरच्या काही चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही तरुणांनी या कॉलसेंटरची स्थापना केली होती. याच्या माध्यमातून ते अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांची फसवणूक करीत होते. या कंपनीने केवळ दोन-तीन वर्षांमध्येच अमेरिकेच्या नागरीकांची दीड कोटी डॉलर्सची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ईडीने गुरुग्राम आणि नवी दिल्ली येथील अनेक स्थानी या प्रकरणात शनिवारी धाडी टाकून हा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातल्या आरोपींनी अमेरिकेच्या नागरीकांच्या बँक खात्यांची माहिती बेकायदेशीररित्या मिळवून त्यांच्यातून पैशाचा अपहार केल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी एफआयआर नोंद झाला आहे.









