कोमुनिदाद जमीन हडप घोटाळा प्रकरणी कारवाई : 72 लाख, 7 आलिशान गाड्या घेतल्या ताब्यात
पणजी : जमीन बळकाव घोटाळ्याची पाळेमुळे खोदून काढताना अंमलबजावणी संचालनालयाच्या पणजी विभागीय कार्यालयाने हैदराबाद आणि गोवा येथील निवासी आणि व्यावसायिक जागांवर छापे टाकत 72 लाख ऊपये आणि 7 आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. याबाबत माहिती अशी की, यशवंत सावंत आणि इतरांनी गोव्यातील कोमुनिदाद जमिनी बेकायदेशीरपणे बळकावल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी 9 रोजी छापे टाकल्यानंतर काल, बुधवारीही गोवा आणि हैदराबाद येथील 13 निवासी आणि व्यावसायिक जागांवर शोध मोहीम राबवत छापे टाकले.
यशवंत सावंत आणि इतरांनी गोव्यात कोमुनिदाद जमिनी बेकायदेशीरपणे बळकावल्याने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई करताना ईडीने विविध गुन्हेगारी कागदपत्रे ताब्यात घेण्याबरोबरच अंदाजे 72 लाख ऊपयांची रोख रक्कम आणि सात आलिशान वाहने जप्त केली आहेत. आरोपींशी संबंधित अनेक बँक खाती आणि मुदत ठेवी देखील गोठवण्यात आल्या आहेत. संशयित आरोपींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून अंजुना आणि आसगाव येथे लाखो चौरस मीटर कोमुनिदादची जमीन हडप केल्याचा ठपका ठेवला आहे.
जमिनीचे बाजारमूल्य 1,200 कोटींहून अधिक
अंमलबजावणी संचालनालयाच्या पणजी विभागीय कार्यालयाने गोव्यात कोमुनिदाद जमिनींच्या बेकायदेशीर बळकावण्यासंदर्भात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार छापेमारी केली आहे. संशयित आरोपींनी बेकायदेशीरपणे बळकावलेल्या जमिनींचे एकूण बाजारमूल्य 1,200 कोटी ऊपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता ईडीने व्यक्त केली आहे.









