सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे प्रतिज्ञापत्र
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ईडी, सीबीआय प्रमुखांच्या कार्यकाळ विस्ताराला आव्हान देणाऱया याचिका फेटाळण्याची विनंती केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करत सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. कार्यकाळ विस्ताराला आव्हान देणाऱया याचिका राजकीय हेतूने प्रेरित आहेत. ज्या राजकीय पक्षांचे नेते सध्या ईडीच्या तपासाच्या कक्षेत आहेत, अशा पक्षांशी हे याचिकाकर्ते संबंधित आहेत. काँग्रेस अध्यक्ष, पदाधिकारी अन् तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे. याचिकाकर्ते याच पक्षांशी संबंधित असल्याने ते न्यायालयात याचिका दाखल करून स्वतःच्या नेत्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
याचिकाकर्ते जया ठाकूर, साकेत गोखले, रणदीप सिंह सुरजेवाला आणि महुआ मोइत्रा हे काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेसशी संबंधित आहेत. या पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिला आहे. कार्यकाळ विस्ताराला आव्हान देणाऱया याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याने त्या फेटाळण्यात याव्यात असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या गुन्हय़ांकडे या तपास यंत्रणांनी दुर्लक्ष केले तरच याचिकाकर्त्यांना त्यांच्या निष्पक्षतेवर विश्वास वाटणार आहे. या याचिका राजकीय लाभ प्राप्त करण्यासाठी दाखल करण्यात आल्या आहेत असे केंद्र सरकारने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालय 12 सप्टेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी करणार आहे.









