27-31 जानेवारीदरम्यान होणार चौकशी
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची 20 जानेवारी रोजी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीकडून आता मुख्यमंत्री सोरेन यांना एक पत्र पाठविण्यात आले आहे. यात ईडीने 27-31 जानेवारी दरम्यान चौकशीसाठी वेळ आणि ठिकाण सुचविण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री सोरेन यांची भूमी घोटाळ्याप्रकरणी पुन्हा चौकशी होणार आहे.
ईडीने मुख्यमंत्री सोरेन यांची शनिवारी त्यांच्या निवासस्थानी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी केली होती. सोरेन यांच्यावर जमीन घोटाळा आणि अवैध खाणकामाशी निगडित आरोप असून याप्रकरणी ईडी तपास करत आहे. याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री सोरेन यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज मिश्राच्या घरातून बँक पासबुक तसेच एका चेकबुकसमवेत मुख्यमंत्री सोरेन यांची स्वाक्षरी असलेले दोन चेक हस्तगत करण्यात आले होते असा दावा ईडीने केला आहे. पंकज मिश्रा हा अवैध खाणकामात सामील होता. पंकज मिश्राने सोरेन यांच्या निर्देशावर कोट्यावधी रुपये अन्यत्र वळविण्याचे काम केले होते. पंकज मिश्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.