निवासस्थानी तपास यंत्रणे छापे : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी होतेय चौकशी
वृत्तसंस्था/ चेन्नई
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी तामिळनाडूचे वीजमंत्री व्ही. सेंथिल बालाजी आणि अन्य काही जणांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. बालाजी यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे.
राज्याची राजधानी चेन्नई आणि करूर येथे बालाजी यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात बालाजी यांच्या विरोधात नोकरीच्या बदल्यात रोख रक्कम स्वीकारल्याच्या आरोपाप्रकरणी चौकशी करण्याची अनुमती पोलीस तसेच ईडीला दिली होती. बालाजी यांच्याकडे सध्या उत्पादन शुल्क विभागाचीही जबाबदारी आहे.
पीएमएलएच्या तरतुदींतर्गत ईडीकडून हे छापे टाकण्यात आले आहेत. 26 मे रोजी देखील बालाजी यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. बालाजी यांच्याशी संबंधित विविध शासकीय कंत्राटदारांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयांमध्ये प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. सेंथिल बालाजी यांचे बंधू अशोक यांच्या घरी छापा टाकण्यासाठी पोहोचलेल्या पथकासोबत द्रमुक कार्यकर्त्यांनी झटापट केली होती.









