25 कोटीची संपत्ती जप्त
वृत्तसंस्था/ पाटणा
राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आणि माजी आमदार अरुण यादव यांच्या विरोधात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अरुण यादव यांची सुमारे 25 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यापूर्वी ईडीने फेब्रुवारी महिन्यात अरुण यादव यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. पाटण्यातील राबडी देवी यांच्या नावावर असलेले चार फ्लॅट हे अरुण यादव यांच्या पत्नी अन् आमदार किरण देवी यांच्या नावावर करण्यात आले होते.
ईडीने फेब्रुवारी महिन्यात राजदचे माजी आमदार अरुण यादव, त्यांच्या पत्नी किरण देवी आणि अन्य काही जणांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. ईडीने अरुण यादव आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. माजी आमदाराने बनावट कंपनी निर्माण करत हे फ्लॅट्स खरेदी केले होते असा आरोप आहे. अरुण यादव हे लँड फॉर जॉब्स घोटाळ्याप्रकरणी देखील संशयाच्या भोवऱ्यात आहेत.









