विश्वचषक फुटबॉल स्पर्धा ः व्हॅलेन्सियाचे दोन गोल
वृत्तसंस्था/ अल खोर, कतार
येथील अल बायत स्टेडियमवर 22 व्या विश्वचषक स्पर्धेच्या शानदार उद्घाटनानंतर झालेल्या गट अ मधील पहिल्या सामन्यात इक्वेडोरने विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करणाऱया यजमान कतारचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. अनुभवी स्ट्रायकर एनर व्हॅलेन्सियाने दोन्ही गोल नोंदवले. या स्पर्धेत पहिले दोन गोल नोंदवण्याचा मान त्याने पटकावला.
आजपर्यंत यजमान संघाला पहिल्या सामन्यात पराभव टाळण्यात यश आले होते. पण कतारला ही परंपरा कायम राखता आली नाही. पहिल्याच सामन्यात यजमान पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. या सामन्याच्या तिसऱयाच मिनिटाला व्हॅलेन्सियाने हेडरवर शानदार गोल नोंदवला होता. पण व्हिडिओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) द्वारे रिव्हय़ू पाहिल्यानंतर हा गोल ऑफसाईड ठरवून फेटाळून लावण्यात आला. कतारने या स्पर्धेसाठी बऱयाच कालावधीपासून तयारी केली होती. पण त्यांना या सामन्यात इक्वेडोरसमोर फारशी चमक दाखविता आली नाही. त्यांचा गोलरक्षक साद अलशीब तर बराच नर्व्हस झाल्याचे दिसून आले. त्याच्या या नर्व्हसनेसमुळेच झालेल्या चुकीने इक्वेडोरला 16 व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली. त्याआधीही तिसऱया मिनिटाला किरकोळ चूक केल्याने व्हॅलेन्सियाने हेडरवर गोल केला होता. पण नंतर तो रद्द केल्यामुळे त्यांना आघाडी मिळविता आली नव्हती.
व्हॅलेन्सिया हा इक्वेडोरचा सर्वाधिक गोल नोंदवणारा खेळाडू असून त्याने दुसरा गोल 31 व्या मिनिटाला हेडरवर नोंदवला. पूर्वार्धातच दोन्ही गोल नोंदवल्यानंतर उत्तरार्धात कतारने पहिल्या सत्राच्या तुलनेत सरस खेळ केला. त्यामुळे इक्वेडोरला अनेक संधी मिळूनही त्यांना गोल नोंदवता आला नाही आणि खेळही संथ गतीने झाला. दुसऱया गोलवेळी व्हॅलेन्सिया अनमार्क्ड होता. अँजेलो प्रेसियाडोकडून आलेल्या क्रॉसला अचूक हेडरवर अलशीबला चकवत त्याने गोलजाळय़ाची दिशा दाखवली. कतारचे एकंदर प्रदर्शन पाहता पुढील दोन सामन्यांत त्यांना गुण मिळविता येईल किंवा ते पुढील फेरीसाठी पात्र ठरण्याची शक्यता कमी वाटते. इक्वेडोरने यापूर्वी 2006 मधील स्पर्धेत शेवटच्या सोळा फेरीपर्यंत मजल मारली होती. यावेळी त्याहून पुढे मजल मारण्याचे त्यांचे स्वप्न आहे. येथील विजयाचे त्यांना तीन गुण मिळाले. या दोन्ही संघांचे सेनेगल व नेदरलँड्सविरुद्ध सामने होणार आहेत.









