वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर आर्थिक वर्ष 2024 मध्ये 6.3 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. जागतिक स्तरावर आव्हानात्मक स्थिती असतानाही भारताची अर्थव्यवस्था आगामी काळात बऱ्यापैकी राहणार असल्याचेच या अंदाजातून स्पष्ट होत आहे.
सध्याची गुंतवणूक व देशांतर्गत मागणीतील वाढ या पार्श्वभूमीवर हा अंदाज सांगितला गेला आहे. आगामी काळात महागाई बऱ्याच अंशी कमी होणार असल्याचे बँकेने सांगत महत्त्वाच्या वस्तुंच्या पुरवठ्यावर केंद्र सरकारने लक्ष घातले आहे. पुढील काळात वस्तुंच्या किंमती कमी होण्याची शक्यता सांगितली जात आहे. दक्षिण आशियाचा विकास हा यावर्षी 5.8 टक्के इतका होणार असून जगातील इतर विकसित देशांच्या तुलनेत सर्वात अधिक असणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक
व्याजदराबाबत चर्चा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची द्विमासिक पतधोरण समितीची बैठक रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवार 4 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. सदरची बैठक 6 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवस चालणार असून व्याजदर वाढीविषयी समिती सदस्यांमध्ये चर्चा होणार आहे. सदरच्या बैठकीत रेपो दरात याखेपेलाही कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. रेपो रेट 6.5 टक्के सध्याला असून त्यात वाढ होणार नाही.









