तिसऱ्या तिमाहीत 8.4 टक्क्यांची पातळी, अपेक्षेपेक्षाही अधिक
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताची अर्थव्यवस्था आता मोठी झेप घेत आहे. सध्याच्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या, ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत विकासदर 8.4 टक्के राहिला, अशी घोषणा करण्यात आली आहे. आधीच्या अनुमानानुसार तो 7 टक्के राहण्याची शक्यता होती. तथापि, प्रत्यक्षात तो त्यापेक्षा जवळपास दीड टक्के अधिक आहे. सध्या सुरु असणाऱ्या 2023-2024 या आर्थिक वर्षाचा एकंदर विकासदर 7.6 टक्के राहील असे नवे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. यापूर्वीच्या अनुमानानुसार या संपूर्ण वर्षाचा आर्थिक विकास दर 6.8 टक्के राहू शकेल, असे अनुमान व्यक्त करण्यात आले होते. तथापि, प्रत्यक्षात विकासदर 0.8 टक्क्याने अधिक असेल अशी माहिती अर्थ विभागाकडून देण्यात आली आहे.
वित्तीय तूटही कमी
जानेवारी 2024 च्या अखेरीस केंद्र सरकारची वित्तीय तूट तिच्या अनुमानाच्या 63.3 टक्के असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ती 67.8 टक्के इतकी होती. याचाच अर्थ असा की, वित्तीय तूटही सध्याच्या आर्थिक वर्षात सुसहनीय प्रमाणात आहे. अर्थव्यवस्था आता वेगाने प्रगतीपथावर आहे, याचेच हे स्पष्ट संकेत आहेत, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.
आकडेवारी प्रसिद्ध
सध्या सुरु असणाऱ्या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने वित्तीय तुटीचे ध्येय 18 लाख कोटी रुपयांचे ठेवलेले होते. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांमध्ये त्यापैकी 11 लाख कोटी रुपयांची पातळी जानेवारीच्या अखेरीस गाठली गेली आहे. हे आर्थिक वर्ष संपेपर्यंतच्या दोन महिन्यांमध्ये ती आणखी वाढणार असली तरी अनुमानापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. विकासदरात अपेक्षेपेक्षा अधिक वाढ आणि वित्तीय तूट अपेक्षेपेक्षा कमी, ही स्थिती अर्थव्यवस्थेची जोमदार प्रगती होत असल्याचे दर्शवून देत आहे. आगामी आर्थिक वर्षातही अर्थव्यवस्था वाढीचा दर याच पातळीवर राहण्याची शक्यता असल्याची चर्चा आर्थिक क्षेत्रात आहे.
राज्यांनाही अधिक रक्कम
केंद्र सरकारच्या करसंकलनात यंदा समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्रीय करांमधून राज्यांना मिळणारी रक्कमही वाढली आहे. यंदा आतापर्यंत राज्यांना एकंदर 8 लाख 20 हजार 250 कोटी रुपयांची रक्कम केंद्रीय करांमधील वाट्याच्या स्वरुपात मिळाली आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे. अनुदानांमध्येही वाढ झाली असून आतापर्यंत या आर्थिक वर्षात मुख्य अनुदानांसाठी 3 लाख 15 हजार 559 कोटी रुपये देण्यात आले आहेत.









