जानेवारीत कर्मचाऱ्यांवर बोजा वाढणार
प्रतिनिधी/ बेळगाव
सलग सुट्यांमुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आर्थिक व्यवहार थंडावले. सरकारी कार्यालये तसेच बँकांना सलग सुट्या असल्यामुळे आर्थिक व्यवहार होऊ शकले नाहीत. 15 दिवसांपूर्वी झालेले कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन आणि त्यापाठोपाठ आता काँग्रेस अधिवेशन व जोडून आलेल्या सुट्यांमुळे अधिकारीच कार्यालयात नसल्याने अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांवरचा बोजा वाढण्याची शक्यता आहे.
25 डिसेंबर रोजी नाताळ, 27 रोजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानिमित्त सरकारी सुटी, 28 रोजी चौथा शनिवार तर 29 रोजी साप्ताहिक सुटी अशा आठवड्यात चार सुट्या सरकारी कार्यालयांना मिळाल्या. आधीच इयर एंडिंगमुळे कर्मचारी सुटीवर आहेत. त्यातच सलग सुट्यांमुळे सरकारी कार्यालयांमधील काम पूर्णपणे ठप्प होते. कार्यालयात अधिकारीच नसल्याने सोमवारपासून कर्मचारी कामावर येतील, असे उत्तर देण्यात येत होते.









