पणजीत मनोहर पर्रीकर स्मृती व्याख्यानाला प्रतिसाद
पणजी : एखादे राष्ट्र आपले सार्वभौमत्व हे देशाच्या अधिकारावर व जनतेच्या प्रेमावरच राखू शकते. आपल्याकडे आर्थिक ताकद आहे, आपल्याकडे राजकीय स्थैर्य आहे, आपल्याकडे मानव संसाधन आहे, हीच भारताची ताकद असून, परिमाणात्मक आणि गुणात्मकदृष्ट्याही मजबूत आहे. आपले संरक्षण केवळ संरक्षण मंत्रालयाशी संबंधित नाही. भारताचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. स्व. मनोहर पर्रीकर यांनी आपल्या कार्यातून तसे दाखवून दिले आहे, असे उद्गार लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांनी काढले. पणजी येथे आयोजित केलेल्या तिसऱ्या मनोहर पर्रीकर स्मृती व्याख्यानमाला कार्यक्रमात ते व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, तेजेंद्र लवंदे, उत्पल पर्रीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला टेबल कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. माविन गुदिन्हो यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी गोव्यासाठी दिलेले योगदान व त्याची उपयुक्तता स्पष्ट केली. मनोहर पर्रीकर यांनी दूरदृष्टी ठेवून गोव्याचा विकास साधला. त्यांचे व आपले नाते हे केवळ राजकारणी एवढ्यापुरतेच मर्यादित नव्हते, तर मित्रत्वाचेही होते, असे सांगितले. राज्यपाल पिल्लई यांनी गोव्याच्या विकासाचे कौतुक करताना दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी दिलेले योगदान हे फार मोठे असल्याचे सांगितले. पर्रीकर हे केवळ गोव्याचे नेतृत्व नव्हते, तर ते भारताचे उत्तम नेतृत्व करणारा कणखर नेता होता, असा शब्दात गौरवोद्गार काढले. त्यांनी गोव्यातील जनतेला मनोहर पर्रीकर यांच्या कार्याचा आदर नेहमीच ठेवण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री सावंत यांनी पर्रीकर म्हणजे एक ज्ञानाचे भांडार होते, असे सांगितले. मनोहर पर्रीकर म्हणजे राज्याचे भाई होते. त्यांनी विरोधी नेता, मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री या पातळ्यांवर काम करताना आदर्शवादी कार्याला महत्त्व दिले. विज्ञान हा त्यांचा आवडता विषय होता आणि कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी, असे पर्रीकर यांचे मत होते. त्यांनी शिक्षणासाठी केलेले कार्यही मोठे आहे. गोव्यात आयआयटी उभी व्हावी, यासाठी मनोहर पर्रीकर आग्रही होते. विद्यमान सरकारने त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष झोकून दिल्याचे सांगितले. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, काणकोण येथे पुलाला दिलेले मनोहर पर्रीकर हे नाव तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मनोहर पर्रीकर स्कॉलर शिष्यवृत्ती यापुढेही देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. उत्पल पर्रीकर यांनीही मनोहर पर्रीकर यांच्या कार्याला उजाळा देताना सांगितले की, राज्याला केवळ नेता लाभला नव्हता, तर माझ्या वडिलांच्या ऊपाने आधार देणारी व्यक्ती लाभली. घरचा विचार न करता प्रथम राष्ट्रकार्याला महत्त्व देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच मनोहर पर्रीकर होते. सर्जिकल स्ट्राईक राबविताना जवानांनाही बाधा पोचू नये, याची काळजी घेणारे म्हणजे मनोहर पर्रीकर हे होते आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे, अशा शब्दात उत्पल पर्रीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमात मनोहर पर्रीकर यांच्यावर लिहिलेल्या ‘साधी राहणी, उच्च विचार’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.









