कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांचे प्रतिपादन : पर्यावरणस्नेही रस्ते देखभाल शक्य
बेळगाव : स्टील स्लॅगवर आधारित ‘इकोफिक्स’ तंत्रज्ञानामुळे रस्त्यांची देखभाल करण्याच्या कामात क्रांती होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाला हानी न पोहोचविता रस्त्यांची देखभाल करता येईल, अशी प्रतिक्रिया कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम अधिकारी एच. सुरेश, धारवाडचे मुख्य अभियंते आणि बेळगावच्या महापौर सविता कांबळे यांच्यासह मंगळवारी या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक राकसकोप-सुतगट्टी मार्गावर पाहिले. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजविता येतात. प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर रजनीश यांनी या तंत्रज्ञानासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली.
या तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकाचे नेतृत्व त्याचे निर्माते आणि सीएसआयआर-सीआरआरआयचे मुख्य संशोधक सतीश पांडे यांनी केले होते. या मार्गावरील पाण्याने भरलेला एक खोल खड्डा या तंत्रज्ञानामुळे कसा त्वरित, तसेच योग्यप्रकारे भरता येतो, हे पांडे यांनी या सर्व मान्यवरांना प्रत्यक्ष दाखवून दिले. पाण्याने भरलेला खड्डा कोरडा न करताही तो बुजविता येतो, हे या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्या आहे. खड्डे बुजविण्याचे पारंपरिक तंत्रज्ञान पावसाळ्याच्या दिवसांमध्ये निरुपयोगी ठरते. मात्र, हे नवे तंत्रज्ञान पावसातही उपयोगात आणता येते, हे पांडे यांनी या प्रात्यक्षिकाच्या कार्यक्रमात स्वत:च्या नेतृत्वात सिद्ध केले आहे.
किफायतशीर तंत्रज्ञान
खड्डे बुजविण्याच्या पारंपरिक तंत्रज्ञानापेक्षा हे नवे तंत्रज्ञान 15 ते 20 टक्के स्वस्त आहे. हे यांत्रिक तंत्रज्ञान असल्याने त्याचा उपयोग करण्यासाठी कामगारही कमी लागतात. त्याखेरीज खड्डे बुजविण्याचे काम वेगाने होते. कोणत्याही सीझनमध्ये हे तंत्रज्ञान उपयोगात आणता येत असल्याने काम थांबवावे लागत नाही. या तंत्रज्ञानाने खड्डे बुजविल्यास किमान दोन ते तीन वर्षे पुन्हा बुजवावे लागत नाहीत. खड्डा कितीही खोल असला तरी तो भक्कमपणे बुजविता येतो, असे या तंत्रज्ञानाचे अनेक लाभ आहेत, हे पांडे यांनी दाखवून दिले आहे.
अनेक मान्यवर उपस्थित
खड्डे बुजविण्याचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी बेळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अरुणकुमार पाटील, बेळगाव विभागाचे सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता एस. एस. सोबार्ड, रामुका ग्लोबल सर्व्हिसेस या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शानकी गोयल, या संस्थेच्या ज्येष्ठ व्यवस्थापक निधी केजरीवाल, तसेच मार्ग निर्मिती क्षेत्रातील आणि कर्नाटक सरकारचे अनेक मान्यवर उपस्थित होते.









