पणजी /प्रतिनिधी
राज्यातील पंचायत निवडणुका ठरल्यानुसार 10 ऑगस्ट रोजी होणार हे निश्चित झाल्याने राज्य विधानसभेच्या अधिवेशनाला आता ग्रहण लागले आहे. या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अधिवेशन दोन दिवस की पाच दिवस करायचे, यावर आज होणाऱया बैठकीत निर्णय होईल.
विधानसभा कामकाज सल्लागार मंडळाची बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत सभापती रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी सकाळी विधानसभा प्रकल्पात होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या अगोदर मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर पुढील पाच महिन्यांसाठी लेखा अनुदान मागण्या विधानसभेत मंजूर करून घेतल्या होत्या.
नियमानुसार 15 ऑगस्टपर्यंत अर्थसंकल्प मंजूर होणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन 11 जुलैपासून निश्चित केले होते. सरकारने पंचायत निवडणुका पुढे ढकलल्यानंतर अगोदर उच्च न्यायालयाने व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे म्हणणे फेटाळून लावले असल्याने आता राज्य निवडणूक आयोगाने जी तारीख निश्चित केलेली आहे त्यानुसार 10 ऑगस्ट रोजी पंचायत निवडणुका होतील.
सरकारची होणार गोची
या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात आचारसंहिता लागू होत आहे आणि त्यामुळेच विधानसभेत कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर देखील सरकारला व मंत्र्यांना आश्वासने देता येणार नाहीत आणि त्यामुळे विधानसभेच्या कामकाजावर मोठय़ा प्रमाणात मर्यादा येतील आणि मंत्र्यांना किंवा सत्ताधारी पक्षांना कोणतेही आश्वासन देता येत नसल्याने त्यांची फार गोची होणार आहे.
सरकारसमोरील पर्याय
आता सरकार समोर एकच पर्याय शिल्लक आहे व तो म्हणजे अधिवेशनाचा कार्यकाल हा 25 दिवसांवरून केवळ पाच दिवसांवर आणणे. यामध्ये अर्थसंकल्पाचा दुसरा भाग संमत करून घेणे व त्यानंतर पुन्हा एकदा सप्टेंबरमध्ये किंवा ऑगस्टमध्ये गणेश चतुर्थीच्या अगोदर उर्वरित अर्थसंकल्पाला मान्यता देणे आणि अधिवेशनातील उर्वरित कामकाज पूर्ण करून घेणे किंवा शक्मय नसेल तर ऑक्टोबरमध्ये अधिवेशन बोलवून त्यात सारे कामकाज पूर्ण करून घेणे हे पर्याय सरकार समोर आहेत.









