गुवाहाटीहून मध्यातूनच परत आलेले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले शिवसेना (ठाकरे गटाचे) आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशीसाठी बोलावले आहे. राजन साळवी (Rajan Salvi) आणि वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यानंतर एसीबीची नोटीस मिळालेले ठाकरे गटातील देशमुख हे तिसरे आमदार आहेत.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर (Balapur) विधानसभेचे आमदार असलेले नितीन देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शिवसेनेशी (ठाकरे गटाशी) निष्ठा ठेवल्यामुळे मला एसीबीची नोटीस मिळाली आहे. माझी निष्ठा बदलण्यासाठी माझ्यावर दबाव जात असल्याचा आरोप त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “मला एसीबीकडून नोटीस मिळाली असून मला मालमत्तेच्या विवरणाबाबत 17 जानेवारीला उत्तर देण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाबरोबर गेलेल्या खासदार भावना गवळी (Bhavna Gavli) यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला होता. तर आता अमरावतीच्या एसीबी कार्यालयाने मला नोटीस बजावली आहे. मी त्याला उत्तर देईन. या नोटीसमध्ये तक्रारीचा कोणताही तपशील नाही” असे सांगून 17 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भुमिका मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Previous Articleपाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुरड्यांचा मृत्यू
Next Article देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमाला १६ पासून








