कोल्हापूर :
बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या केकला ठराविक कालावधी असते. मात्र केकच्या बॉक्सवर मॅन्युफॅक्चरींग आणि एक्सपायरी डेटचा कोणताच उल्लेख दिसून येत नाही. एक केक विक्रीसाठी दोन ते तीन दिवस ठेवला जातो. त्यामुळे केकच्या एक्सपायरीच्या कालावधीकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नियमावलीचे पालन न करता केकची विक्री सुरु आहे. प्रशासन आणि विक्रेत्यांचा निष्काळजीपणा चिमुकल्यांच्या जीवावर उठत आहे.
गेल्या काही वर्षांपासून वाढदिवसाच्या केकसह कप केकची मागणी मोठयाप्रमाणात वाढली आहे. केकची विक्री करत असताना ते मुदतबाह्य झाले आहेत का? ते तयार करताना त्यामध्ये कोणते घटक वापरलेत याची पडताळणी अन्न औषध विभागाकडून होणे आवश्यक आहे. पण याकडे दुर्लक्ष होत आहे. स्वस्त केकसाठी प्रीमिक्स पावडर, ताजेपणा टिकवण्यासाठी स्टॅबीलायझर जेल, कुलींग स्टोअरेजचे दुर्लक्ष, इसेन्स व आरोग्यघातक पदार्थाचा वापर होत असल्याची चर्चा आहे. २४ तासानंतर केकमध्ये बुरशी तयार होण्यास सुरुवात होते. त्यामुळे असे केक कालबाह्य झालेले केक आरोग्यास हानीकारक असतात.
कागल तालुक्यातील चिमगाव येथील दोन चिमुकल्यांना केकमधून विषबाधा होऊन, जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेची चर्चा जिल्हाभर सुरु आहे. त्यामुळे केक खायचा की नाही असा प्रश्न आता उभा राहीला आहे.
पूर्वी घरगुती केकसाठी मैदा, लोणी, अंडी याचा वापर केला जात होता. यामुळे केक महाग असत. पण आता अवघ्या दोनशे रुपयांपासून केक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. स्वस्त केकसाठी मैद्याऐवजी प्रिमिक्स पावडरचा वापर सर्रास सुरू आहे. तर केक जादा दिवस रहावा व ताजेपणा टिकून रहावा म्हणून तसेच, केकला डिझाईंन, चकाकीसाठी स्टॅबिलायझर जेलचा वापर सुरू आहे. हा जेल आरोग्यासाठी हानिकारक असल्याने, भारत वगळता जगभरात या स्टॅबिलायझर जेलवर बंदी असल्याचे सांगण्यात आले.
स्वस्तातील बेकरी पदार्थ खाणे टाळा
खाद्यपदार्थांचे सेवन करताना त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या अन्य घटकांचा दर्जाही लक्षात घेणे आवश्यक आहे. केक तयार करताना त्यासाठीचा कच्चा माल कोणत्या दर्जाचा वापरला आहे यावर त्या केकची किंमत ठरते. क्रीम केक फ्रीजमधून बाहेर काढला की एका तासातच आंबटपणा येतो. त्यामुळे केक खरेदी करताना त्याचा दर्जा तपासून आणि खात्रीशीर दुकानामधूनच खरेदी करावा.
सत्यजीत खाडे, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा बेकर्स ग्राहक सहकारी संस्था.
केक फ्रिजऐवजी काचेच्या शोकेसमध्येच
कोल्हापुरात 250 पेक्षा अधिक बेकरी व केक शॉपी असून, अनेक ठिकाणी केक बनवणे व काचेच्या शोकेसमध्ये ठेवणे हा प्रकार अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. जाणकार केक शेफच्यामते कोणताही केक फ्रिजमध्ये वा फ्रिजसारख्या शोकेसमध्ये ठेवावा लागतो. या केकसाठी मायनस दोन इतके तापमान कायम असावे लागते. पण याकडे विक्रेत्यांकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.
केकविषयी माहिती नसलेल्या बॉक्समधून विक्री
वाढदिवस, उत्सव, विवाह, नाताळसाठी केकची मोठी विक्री होत असते. यामध्ये 30 ते 40 प्रकारच्या व विविध आकारातील केकला मोठी मागणी आहे. हा केक ंपुठ्ठ्याच्या पांढऱ्या वा इतर बॉक्समधून विकला जातो. पण या बॉक्सवर न्यूट्रीशन व्हॅल्यू म्हणजे प्रॉडक्शन डेट, एक्स्पायरी डेट, त्याचा दर्जा, यामध्ये कोणते घटक वापरलहृ याचा कोणताच उल्लेख नसतो. याकडे अन्न, औषध प्रशासन ‘अर्थ’पूर्वक दुर्लक्ष करत असून, इतर बाबीकडे मात्र हा विभाग तत्परता दाखवत आहे. सध्या नाताळसाठी बाजारात युरोपियन केकची आवक झाली असून, याबाबत ही दुर्लक्ष केले जात आहे.








