कोल्हापूर प्रतिनिधी
महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजपाचे खासदार ब्रिजभूषण यांच्या विरोधात सोमवारी कोल्हापूरात धरणे आंदोलन करण्यात आले. सर्वपक्षीय महिला संघर्ष समितीच्यावतीने पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. ब्रिजभूषण यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा ईशाराही यावेळी देण्यात आला.
भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपुटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलनानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांच्यावर शासन कोणतीच कारवाई करत नाही, या निषेधार्थ सोमवारी सर्वपक्षीय महिला संघर्ष समितीच्यावतीने पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार ब्रिजभूषण सिंग यांचा धिक्कार असो… अशा घोषणा देत ब्रिजभूषण यांना पाठिशी घालणाऱ्या भाजप सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कडक कारवाई करा अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा ईशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी सीमा पाटील, माजी नगरसेविका भारती पवार, गीता हासुरकर, तनुजा शिपुरकर, आर. के. पवार, अॅङ महादेवराव आडगुळे, काम्रेड दिलीप पवार, पद्मजा तिवले, शैला साळुंखे, महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर, हिंद केसरी दीनानाथ सिंग, विनोद चौगुले, चंद्रकांत चव्हाण, सुधीर हांजे, संभाजी पाटील, राजेश वरख, व्ही. बी. पाटील, माजी महापौर मारुतीराव कातवरे, माजी नगरसेवक ईश्वर परमार आदी उपस्थित होते.








