कोल्हापूर :
वातावरणाच्या सततच्या बदलामुळे विविध आजार पसरविणाऱ्या विषाणूंची वाढ होते. त्यातच प्रतिकारशक्तीही कमी होत असल्याने ताप, सर्दी, खोकला, घशाच्या रूग्णात वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशा वातावरणात लहान मुले, वृद्ध त्याचबरोबर दमा, फुफुसाचे आजार, मधुमेह, रक्तदाब असणाऱ्या रूग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आजाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे आहे. यासाठी फळे, पालेभाज्या असा सकस आहार घ्यावा, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस थंडीचा कडाका वाढला होता. यानंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडी कमी होत गेली. मागील दोन तीन दिवसांपासून तर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. शनिवारी पहाटे अचानक पावसाने हजेरी लावली. यानंतर हवेत थोडा गारवा निर्माण झाला होता. अशा संमिश्र वातावरणामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे.
सध्या सकाळी पाऊस दुपारी उष्मा सायंकाळी ढगाळ रात्री पुन्हा थंडी अशा संमिश्र वातावरणाचा सामना करावा लागत आहे. याचा शरीरावर परिणाम होत आहे. यामुळे जुनाट आजार डोके वर काढत आहेत. दुपारी उष्म्याने अंगाची लाही लाही होत असताना अचानक गारवा निर्माण होत असल्याने आरोग्य बिघडत आहे. ताप, सर्दी, खोकला, घशाच्या आजाराचे लक्षणे दिसताच अंगावार न काढता डॉक्टरांकडून उपचार घेणे आवश्यक आहे. वेळीच उपचार घेतले नाही तर न्युमोनियासारख्या आजाराला आमंत्रण मिळू शकते. सध्या महापालिका आरोग्य केंद्र, सीपीआरसह खासगी हॉस्पिटलमध्ये सर्दी, ताप, घशाचे रूग्ण वाढत आहेत.
अशी घ्या काळजी…
सकस आहाराचा समावेश
दिवसातून दोनवेळा वाफ घ्या
बाहेर पडताना मास्क वापरा
पुरेपुर विश्रांती घ्या
रोज सकाळी मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या करा
पाणी भरपुर प्या,
वेळीच उपचार व सकस आहाराची गरज
बदलत्या वातावरणामुळे विविध आजार पसरविणाऱ्या विषाणूंमध्ये वाढ होत असते. यामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन व्हायरल इन्फेक्शचे आजार बळावतात. अशावेळी दमा, मधुमेह, फुफुसाचे आजार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, सकस आहारासह कोणतेही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.
डॉ. प्रविण नाईक, पॅलेटिव्ह केअर, सेवा रूग्णालय








