बेळगावकरांची गोव्याला अधिक पसंती
बेळगाव : बेळगाव-दिल्ली विमानफेरी वर्षभरापूर्वी तांत्रिक कारणाने बंद करण्यात आली. यामुळे बेळगावहून दिल्लीला जाण्यासाठी विमान प्रवाशांना एकतर हुबळी अथवा गोव्याचा पर्याय निवडावा लागतो. विमानांची संख्या आणि तिकिटांचे दर पाहता बेळगावच्या प्रवाशांना गोवा जवळचा वाटतो. त्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना गोवामार्गे प्रवास करावा लागत आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली शहराला बेळगावमधून थेट विमानसेवा स्पाईस जेटने उपलब्ध करून दिली. एकावेळी तब्बल अडीचशेहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. त्यामुळे बेळगावच्या प्रवासी संख्येतही वाढ झाली होती. परंतु, कोणतेही ठोस कारण न देता तांत्रिक कारण पुढे करत बेळगाव-दिल्ली विमानसेवा अचानक बंद करण्यात आली. उत्तम प्रतिसाद असतानाही विमानफेरी बंद करण्यात आल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत होता.
दिल्ली विमानफेरी बंद झाल्याने प्रवाशांना दिल्ली गाठणे कठीण होत होते. एकतर विमानाने हैदराबाद गाठून तेथून दिल्ली असा काहीजण प्रवास करीत होते. परंतु, यामध्ये वेळ व पैसाही वाया जात होता. हुबळी येथून दिल्ली शहराला आठवड्यातील काही दिवस सेवा देण्यात येते. परंतु, तेथील तिकीटदर अधिक आहे. त्यामुळे बेळगावच्या प्रवाशांना गोव्यातील मोपा किंवा दाबोळी येथील विमानतळ सोयीचे ठरते. बेळगावहून मोपा विमानतळ गाठण्यासाठी तिलारीमार्गे अडीच तासांचा वेळ लागतो. इतकाच वेळ बेळगाव-हुबळी मार्गावरही लागतो. त्यामुळे हुबळीपेक्षा गोव्याला बेळगावमधील प्रवाशांची पसंती असते. दिल्ली, मुंबई, चेन्नई यासह इतर महत्त्वाच्या शहरांना विमानाने ये-जा करण्यासाठी गोवा विमानतळ बेळगावकरांसाठी सोयीचे ठरत असल्याने प्रवाशांचा ओढा गोव्याकडे वाढला आहे. याचबरोबर बेळगावमधूनही दिल्लीला विमानफेरी पुन्हा सुरू करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
दिल्ली विमान प्रवासाचे दर
- विमानफेरी तिकीट दर (रुपयात)
- गोवा-दिल्ली 4300 ते 5200
- हुबळी-दिल्ली 7125
- बेळगाव-बेंगळूर-दिल्ली 5300
- हैदराबाद-दिल्ली 4900









