पॅरिस ऑलिम्पिक : लक्ष्य, तनिशा-अश्विनी यांना कठीण ड्रॉ
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
दोन वेळा ऑलिम्पिकपदक जिंकणारी पीव्ही सिंधू व एचएस प्रणॉय यांना पॅरिस ऑलिम्पिकसाठी सोपा गट मिळाला असून 26 जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला प्रारंभ होत आहे. मात्र लक्ष्य सेन आणि तनिशा क्रॅस्टो-अश्विनी पोनप्पा यांना कठीण आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य व टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविले होते. तिला दहावे मानांकन देण्यात आले असून जागतिक क्रमवारीत 13 व्या असणाऱ्या सिंधूला एकेरीत गट एममध्ये ठेवण्यात आले असून याच गटात इस्टोनियाची क्रिस्टिन कुबा, मालदिवची फातिमाथ नबाहा अब्दुल रझाक यांचाही समावेश आहे. तिसरे ऑलिम्पिकपदक मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सिंधू सोपा गट मिळाला असून तिची शेवटच्या सोळा फेरीत चीनच्या सहाव्या मानांकित हे बिंग जिआओशी गाठ पडण्याची शक्यता आहे. जिआओवर मात केल्यास चीनची ऑलिम्पिक चॅम्पियन चेन यु फेई हिच्याशी उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडू शकते. ऑलिम्पिकच्या आधी झालेल्या विविध स्पर्धांत सिंधूला विशेष चमक दाखविता आलेली नाही. त्यामुळे पदकांची हॅट्ट्रिक करण्यासाठी तिला खास मेहनत घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रणॉयला एकेरीत 13 वे मानांकन मिळाले असून त्याला व्हिएतनामचा ली डक फट आणि जर्मनीचा फॅबियन रॉथ यांच्याशी गट के मध्ये मुकाबला करावा लागणार आहे. लक्ष्य सेट हा पुरुष एकेरीत खेळणारा दुसरा भारतीय असेल. त्याला 19 वे मानांकन असून त्याचा एल गटात समावेश झाला आहे. याच गटात तिसरा मानांकित इंडोनेशियाचा जोनातन ख्रिस्तीचाही समावेश आहे. याशिवाय ग्वाटेमालाचा केव्हिन कॉर्डन, बेल्जियमचा ज्युलियन कॅरागी यांनाही या गटात स्थान मिळालेले आहे.
जोनातन ख्रिस्तीविरुद्ध लक्ष्य सेनचे 1-4 असे रेकॉर्ड असून या वर्षात दोनदा ख्रिस्तीने सेनला हरविले आहे. प्रणॉय व लक्ष्य सेन यांनी आपल्या गटात आघाडीचे स्थान मिळविले तर या दोघांची शेवटच्या सोळा फेरीत एकमेकाविरुद्ध गाठ पडू शकेल. जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानावर असणारी भारतीय महिला दुहेरीची जोडी तनिशा क्रॅस्टो व अश्विनी पोनप्पा गट क मध्ये स्थान मिळाले असून हा कठीण गट मानला जातो. या जोडीच्या गटात जागतिक चौथी मानांकित नामी मात्सुयामा-चिहारु शिदा, द.कोरियाची किम सो येआँग-काँग ही याँग, ऑस्ट्रेलियाची सेतयाना मापासा-अँजेला यू या जोड्यांचाही समावेश आहे.
भारताची पुरुष दुहेरीची स्टार जोडी सात्विकसाईराज-चिराग शेट्टी यांच्याकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे. पुरुष दुहेरीत त्यांना तिसरे मानांकन देण्यात आले आहे. मात्र क्रीडा लवादामध्ये जोड्यांच्या संख्येवरून सुनावणी सुरू असल्याने त्यांचा ड्रॉ लांबणीवर टाकण्यात आला आहे. बीडब्ल्यूएफने अद्याप ड्रॉची तारीख जाहीर केलेली नाही. 27 जुलैपासून ऑलिम्पिकमधील बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होणार आहे.









