वृत्तसंस्था/ कोलकाता
23 जुलैपासून येथील विवेकानंद युवा भारतीय क्रीडांगणाच्या मैदानावर होणाऱ्या 134 व्या ड्युरँड चषक प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेत ईस्ट बंगाल एफसी आणि बेंगळूरचा साऊथ युनायटेड एफसी यांच्यात सलामीची लढत होणार आहे. या स्पर्धेत एकूण 43 सामने 6 विविध शहरांमध्ये खेळविले जाणार असून सदर स्पर्धा 23 ऑगस्टला संपणार आहे.
भारतीय फुटबॉल क्षेत्रातील ही सर्वात जुनी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. सदर स्पर्धेत 24 संघांचा समावेश असून ते 6 विविध गटात विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटात 4 संघांचा समावेश आहे. प्राथमिक टप्प्यामध्ये प्रत्येक संघ आपल्या गटातील उर्वरीत 3 संघांमध्ये सामने खेळेल. या 6 गटातील विजेते तसेच दुसऱ्या स्थानावरील संघ उपांत्यपूर्वफेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्यपूर्व फेरीतील सामने 12 संघांमध्ये खेळविले जातील. ही फेरी 16 आणि 17 ऑगस्ट रोजी होणार असून उपांत्यफेरी 19 आणि 20 ऑगस्टला निश्चित केली आहे. अ आणि ब गटातील सामन्यांचे यजमानपद कोलकाता भूषविणार आहे. ब गटातील सामन्यांना 28 जुलैपासून तर अ गटातील सामन्यांना 24 जुलैपासून प्रारंभ होईल. ड गटातील सामने कोक्राजेर येथे 27 जुलैपासून खेळविले जातील. या स्पर्धेतील विद्यमान विजेता नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी संघाचा पहिला सामना 2 ऑगस्ट रोजी फॉरेन सर्व्हिस संघाबरोबर होणार आहे. इंफाळमध्ये फ गटातील सामने 30 जुलैपासून सुरू होणार आहेत.









