वृत्तसंस्था/ कोलकाता, गुवाहटी
103 व्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेत कोलकाताच्या विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात इस्ट बंगाल एफसी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी मोहन बागानचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव करत विजयी सलामी दिली तर अन्य एका सामन्यात रविवारी गोकुळम केरळ संघाने केरळ ब्लास्टरचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला.
इस्ट बंगाल आणि मोहन बागान यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत आकर्षक झाला. या सामन्यातील एकमेव निर्णाय गोल इस्ट बंगालच्या नंदकुमार शेखरने केला. 1919 नंतर इस्ट बंगालचा बागानवरील हा पहिला विजय आहे. सामन्याच्या पूर्वाधात दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी वाया दवडल्या. दुसऱ्याच मिनिटाला बागान संघातील अमांदोचा फटका गोलपोस्टच्या बाहेरुन गेल्याने बागानला आपले खाते उघडता आले नाही. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर नंदकुमार शेखरने बागानच्या बचावफळीला तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत एकमेव निर्णायक गोल नोंदवला. त्यानंतर बागान संघाला शेवटपर्यंत आपले उघडता न आल्याने इस्ट बंगालने हा सामना जिंकत पूर्ण गुण वसूल केले.
या स्पर्धेतील रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात गोकुळम केरळने केरळ ब्लास्टरचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव करत 3 महत्त्वाचे गुण मिळवले. या सामन्यात पूर्वार्धात 4 तर उत्तरार्धात 3 गोल नोंदवले गेले. गोकुळम केरळतर्फे 17 व्या मिनिटाला अमिनोयुने, 43 व्या मिनिटाला श्रीकुटेनने, 46 व्या मिनिटाला अॅलेक्स सांचेझने तर 47 व्या मिनिटाला के. अभिजितने गोल केला. केरळ ब्लास्टरतर्फे इमॅन्युअल जस्टीनने 34 व्या मिनिटाला, प्रबिर दासने 54 व्या मिनिटाला अॅड्रियन लुनाने 77 व्या मिनिटाला गोल नोंदवले.









