वृत्तसंस्था/ कोलकाता
येथील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिचा खून केल्याच्या प्रकरणावरुन संपूर्ण शहरामध्ये आंदोलन सुरू असल्यामुळे सॉल्टलेक स्टेडियमवर होणारा ईस्ट बंगाल व मोहन बागान यांच्यातील फुटबॉल सामना रद्द करावा लागला.
या सामन्याला दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार होते. सॉल्टलेक स्टेडियमची क्षमता सुमारे 62 हजार शौकिनांची आहे. दरम्यान कोलकाता शहरातील प्रमुख मार्गांवर वारंवार दगडफेकीचे प्रकार सुरु असून या स्टेडियमच्या जवळपास वातावरण तंग असल्याने पोलीस खात्याने येथे बंदोबस्त वाढविला आहे. या परिसरात या सामन्यावेळी हिंसक घटना घडण्याची शक्यता असल्याने आयोजकांनी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्टेडियमच्या परिसरामध्ये पोलीस खात्यातर्फे जमावबंदीचा आदेश बजावण्यात आला आहे.









