रिश्टर स्केलवर राहिली 6.9 ची तीव्रता : जीवितहानी नाही
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानमध्ये भूकंपाचे जोरदार झटके जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 6.9 इतकी राहिली आहे. जपानच्या क्यूशूमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे केंद्र जमिनीत 37 किलोमीटर खोलवर होते. या भूकंपामुळे कुठल्याही प्रकारच्या हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. याचबरोबर जपानच्या हवामान विभागाने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. भूकंपाचे केंद्र दक्षिण-पश्चिमेकडील बेट क्यूशूमध्ये होते. तर त्सुनामीचा इशारा मियाजाकी प्रांतासोबत नजीकच्या कोच्चि प्रांतासाठी जारी करण्यात आला आहे.
मागील वर्षी 8 ऑगस्ट रोजी जपानमध्ये 6.9 आणि 7.1 तीव्रतेचे दोन शक्तिशाली भूकंप झाले होते, ज्याचा प्रभाव क्यूशू आणि शिकोकूमध्ये सर्वाधिक दिसून आला होता. अधिकाऱ्यांनी यावेळी अनेक क्षेत्रांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला असून अद्याप कुठल्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. जपान हा देश प्रशांत महासागरातील ज्वालामुखीय आणि फॉल्ट लाइन्सच्या रिंग ऑफ फायरमध्ये स्थित आहे. जपानमध्ये 2004 मध्ये भीषण भूकंपानंतर त्सुनामी आली होती. या त्सुनामीने जपानला दिलेल्या वेदना लोक अद्याप विसरलेले नाहीत. 26 डिसेंबर 2004 रोजी भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीमुळे जपानमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.
7 जानेवारीला तिबेटमध्ये भूकंप
यापूर्वी 7 जानेवारी रोजी तिबेटमध्ये भूकंप झाला होता, यात 126 जणांचा मृत्यू झाला होता. या भूकंपामुळे तिबेटमध्ये शेकडोंच्या संख्येत घरं जमीनदोस्त झाली आहेत. या भूकंपाचा सर्वाधिक प्रभाव तिबेटच्या टिंगरी काउंटीमध्ये दिसून आला. तसेच या भूकंपाचे धक्के भारत, नेपाळ आणि भूतानपर्यंत जाणवले आहेत.









