4.0 रिश्टर स्केल तीव्रता : हानी नाही : बिहारमध्येही जाणवले धक्के
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशाची राजधानी दिल्ली शहराला सोमवारी पहाटे भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची क्षमता रिश्टर प्रमाणात 4.0 इतकी होती. या भूकंपाचे केंद्र दिल्लीतील दुर्गाबाई देशमुख महाविद्यालयाच्या नजीक भूमीत खोलवर होते. या भूकंपात फारशी हानी झालेली नाही, अशीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
भूमीखाली 5.36 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते. भूकंपाला प्रारंभ होताच भूमीतून येणाऱ्या मोठ्या ध्वनीमुळे अनेक नागरिकांना झोपेतून जाग आली. हादरे बसू लागल्यानंतर असंख्य लोक त्वरेने घराबाहेर पडले. साधारणत: 35 सेकंदांपर्यंत या भूकंपाचे हादरे बसत राहिले, अशीही माहिती देण्यात आली आहे.
पंखे हलू लागले
भूकंपाचे धक्के बसू लागल्यानंतर इमारतींमधील घरांमधले पंखे, खिडक्यांची तावदाने आणि कपाटे हलू लागली होती. या दृष्यांचे व्हिडीओ सध्या प्रसिद्ध केले जात आहेत. भूप्रस्तरांच्या हालचालींमुळे आणि ते एकमेकांवर घासले गेल्याने भूकंप काळात भूमीतून मोठा ध्वनी येत होता, असे कारण तज्ञांनी स्पष्ट केले आहे. या भूकंपाचे केंद्र फारसे खोल नव्हते. त्यामुळे हादरे तीव्र प्रमाणात जाणवले.
नंतर आणखी सौम्य धक्के
मुख्य भूकंप होऊन गेल्यानंतर काही काळ आणखी सौम्य हादरे जाणवले होते. दिल्लीच्या धौला कुआ भागातील सरोवराच्या परिसरात आणखी काही काळ हादरे जाणवले. या भागात दर तीन ते चार वर्षांनी सौम्य भूकांपाचे धक्के जाणवतात. 2015 मध्येही या भागात 3.3 रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला होता.
भूकंपप्रवण क्षेत्र
दिल्लीतील धौला कुवा क्षेत्र भूकंपप्रवण मानले जाते. तेथे नेहमी असे हादरे जाणवतात. तथापि, लोकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. गेल्या 20 वर्षांमध्ये या भागात भूकंपाचे 420 धक्के बसले आहेत. या हादऱ्यांमुळे मोठी हानी झालेली नाही. अनेक हादरे अनुभवास येऊनही दिल्ली सुरक्षित आहे. लोकांनी शांत राहून आपली सुरक्षा साधावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हानी नसल्याने दिलासा
या भूकंपाने कोणतही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाला संपूर्ण शहरातून कोठूनही येण्याचा निरोपही मिळालेला नाही. सर्व इमारती सुरक्षित आहेत. हादरे तीव्र नसल्याने मोठाच दिलासा नागरिकांना आणि प्रशासनाला मिळाला आहे. भूकंप झाल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये नागरिकांचे व्यवहार पूर्ववत झाले. वाहतूक आणि वीजप्रवाह अखंडित राहिला. उंच इमारतींच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांना भूकंप अधिक प्रमाणात जाणवल्याचे दिसून आले.
पंतप्रधान मोदी यांचे आवाहन
नागरिकांनी न घाबरता शांत आणि सावध रहावे. दिल्ली सुरक्षित आहे. प्रशासन कोणत्याही स्थितीशी दोन हात करण्यास सज्ज आहे. पहाटेच्या भूकंपानंतर आणखी काही हादरे बसू शकतात. लोकांनी एकमेकांना सहकार्य करण्यास सज्ज रहावे. आवश्यकता भासल्यास प्रशासनाच्या संबंधित विभागांशी संपर्क करावा, असे आवाहन आपल्या संदेशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना केले आहे.
राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया
दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही या भूकंपावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी सर्व लोकांच्या सुरक्षेसाठी आपण प्रार्थना केली असल्याचा संदेश प्रसारित केला आहे. दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते तेजिंदरसिंग बग्गा यांनी त्यांना भूकंप जाणवल्याक्षणीच ‘भूकंप?’ असा शब्द ‘एक्स’वरुन प्रसारित केला. काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनीही असाच संदेश प्रसारित केला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आपण लोकांच्या सुरक्षेची मनोकामना करीत आहोत, असे संदेश दिला आहे. इतर अनेक पक्षांच्या नेत्यांनीही असे संदेश दिले आहेत.
तज्ञांचा इशारा
दिल्ली शहर भूकंपप्रवण क्षेत्रातच आहे. एकप्रकारे ती भूकंपाच्या तोंडावर बसलेली आहे. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांनी सदैव सावध आणि सजग राहण्याची आवश्यकता आहे. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी यंत्रणा नेहमी सज्ज ठेवण्याची आवश्यकता आहे. चक्रीवादळाची कल्पना जशी लवकर येऊ शकते, तशी भूकंप या नैसर्गिक आपत्तीची येऊ शकत नाही. फारतर अर्धातास आधी त्याचे संकेत मिळतात. त्यामुळे लोकांनीही सदैव सजग राहण्याची आवश्यकता आहे, असा इशारा अनेक भूकंपतज्ञांनी सर्वसामान्य लोकांना दिला आहे.
जीवितहानी नसल्याने समाधान….
ड पहाटे झालेल्या मुख्य हादऱ्यानंतर आणखी काही भागांमध्ये सौम्य हादरे
ड लोकांनी गोंधळून न जाता सावध आणि सतर्क रहावे : पंतप्रधान मोदी
ड इतरही राजकीय नेत्यांकडून लोकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केल्याचे संदेश









