वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरच्या काही भागात गुरुवार, 28 नोव्हेंबर रोजी दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अफगाणिस्तानमध्ये 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाल्यानंतर हे हादरे जाणवल्याचे निदर्शनास आले आहे. हिमालयीन प्रदेशाच्या विविध भागात दुपारी 04.19 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती भागात होता. यापूर्वी, 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.22 वाजता नागालँडमधील किफिरे येथे 3.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तत्पूर्वी, सोमवारी सकाळी त्रिपुराच्या उत्तर जिल्ह्यातील दमचेरा भागात 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपही झाला होता. या नैसर्गिक आपत्तीमध्ये अद्याप कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.









