नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर भारतात मंगळवारी जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर काही राज्यांमध्ये शुक्रवारी पुन्हा धक्के जाणवले. मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये झालेल्या नोंदीनुसार याची तीव्रता 4 रिश्टर स्केलच्या आसपास होती. या दोन राज्यांव्यतिरिक्त मणिपूरलाही शुक्रवारी सकाळी 3.9 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला.
मध्यप्रदेशातील भूकंपाचे केंद्र ग्वाल्हेरपासून 28 किमी दक्षिण-पूर्वेस होते. दुसरीकडे, छत्तीसगडच्या उत्तर भागात शुक्रवारी सकाळी 10.28 वाजता सूरजपूर जिह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्याची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू भातगावपासून 11 किमी अंतरावर होता. यापूर्वी दिल्ली परिसर मंगळवारी आणि बुधवारी असे सलग दोन दिवस हादरला होता. मंगळवारी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होता. त्याचा फटका पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात झाला होता. काही इमारतींची पडझड झाल्यामुळे पाकमध्ये जीवितहानीबरोबरच आर्थिक नुकसानही झाले आहे.









