4.9 रिश्टर स्केल इतकी तीव्रता ः कोठेही नुकसानीची नोंद नाही
प्रतिनिधी/ बेंगळूर
उत्तर कर्नाटकातही पावसाचा जोर वाढलेला असताना बेळगाव जिल्हय़ातील अथणी, विजापूर आणि बागलकोटमध्ये शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसले. मात्र, कोठेही नुकसान वा जीवितहानीची घटना घडली नाही. भूकंपाची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल इतकी होती. सकाळी 6ः20 च्या सुमारास झालेल्या भूकंपामुळे जनतेमध्ये भीती पसरली.
विजापूर जिल्हय़ातील विजापूर शहर आणि तिकोटा तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे धक्के जाणवले. तर बागलकोट जिल्हय़ात जमखंडी तालुक्यातील तुबची, शुर्पल्ली, जंबगी, टक्कोट, टक्कळकीसह अनेक खेडय़ांमध्ये 3 ते 4 सेकंदापर्यंत भूकंपाचे धक्के बसले. महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्हय़ांतही भूकंपाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील सीमेवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले आहे.
विजापूर शहरात रेल्वेस्थानक परिसर, गोलघुमट, गँगबावडी, आश्रय कॉलनी, जोरापूर पेठ तसेच तिकोटा तालुक्यात बिज्जरगी, घोणसगी या ठिकाणी दोन वेळा भूकंप जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. सकाळी 6ः20 ते 6ः24 या कालावधीत भूकंपाची नोंद झाली आहे. 6ः22 वाजता 4.9 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला आहे.
सकाळी 6ः20 वाजता झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू महाराष्ट्रातील सांगली तर 6ः24 वाजता झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू सोलापूर येथे असल्याचे सांगण्यात आले आहे.









