ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात आज पहाटे 4 वाजून 04 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली. ऐन थंडीत पहाटे बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्याने दोन्ही तालुक्यातील लोक भयभीत झाले.
पालघरच्या डहाणू, कासा, आंबोली, धानिवरी, उर्से, धुंदलवाडी, घोलवड, तलासरी बोर्डी या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. सन 2018 पासून या भागात भूकंपाचे मध्यम व सौम्य धक्के बसण्याच्या घटना वर्षातून चार-पाच वेळा घडत आहेत. गेल्या दीड वर्षापासून या भूकंपाची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. सुदैवाने आजपर्यंत या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, भूकंपाच्या सततच्या धक्क्यांमुळे या परिसरातील घरांना तडे गेले आहेत.
अधिक वाचा : महाराष्ट्रात हुडहुडी कायम
दरम्यान, मागील पाच वर्षात या परिसरातील भूकंपाची तीव्रता कमी झाल्याने राज्य शासनाने सुचवलेल्या उपाय योजनाकडे पालघर जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि भूकंप विरोधी व्यवस्थापन दुर्लक्ष करत असल्याची तक्रार करत स्थानिक नागरिकांमधून होत आहे.








