अजितदादांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, राष्ट्रीय कार्याध्यक्ष पटेलांसह सुमारे 35 आमदार भाजपवासी
प्रतिनिधी/ मुंबई
राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजितदादा पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत अखेर बंडाचे निशाण उभारले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वालाही रामराम करत भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये दाखल झाले आहेत. चार वर्षांनी पुन्हा त्यांनी भाजपच्या साथीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामुळे 2019 च्या पहाटेच्या शपथविधीची आठवण झाली आहे. सध्या त्यांच्याबरोबर 37 आमदार असल्याचे सांगितले जात आहे. तथापि अजितदादांबरोबर आमदारच नव्हेतर सुनील तटकरे, अमोल कोल्हे हे दोन खासदार आले आहेत. हा शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राच्या राजकारणाने शिंदेंपाठोपाठ दुसरे बंड अनुभवले आहे. अजितदादांबरोबरच अन्य 9 जणांनाही मंत्रिपद मिळणार आहे. त्यावेळी पहाटेचा शपथविधी झाला तर यावेळी त्यांनी दुपारी शपथ घेत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठाच भूकंप घडवून आणला आहे. या सत्तानाट्यातील भूकंपामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी गेल्या काही महिन्यांपासून सुऊ असलेली अजितदादांच्या मनातील खदखद उफाळून आल्याचेही स्पष्ट झाले. अजितदादांच्या या भूमिकेमुळे राज्यातील आणि प्रत्येक जिल्ह्यातील सत्ता समीकरणही चांगलेच बदलले जाणार आहे. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजूनही पक्ष शरद पवार यांच्याच बाजूने असल्याचे म्हटले आहे. तथापि अजितदादांनीही एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच आपण राष्ट्रवादी सोडली नसल्याचे म्हटल्यामुळे पुन्हा एकदा कायद्याचा आणि घटनेतील कलमांचा काथ्याकूट पाडला जाऊ शकतो.
बंड, गद्दारी नव्हे वेगळी भूमिका
दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यानंतर दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी एकप्रकारे बंड केले असल्याचे सूचित केले आहे. मात्र पक्षाच्या धोरणविसंगत कोणी पाऊल उचलत असेल तर ते योग्य नाही, असे म्हणत त्यावर अधिक भाष्य करणे टाळले. त्याचबरोबर कोणी काहीही दावा केला तरी त्याला काहीही अर्थ नाही. आपण स्वत: सोमवारीच कराड येथे जाऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहोत आणि नव्याने पुन्हा लोकांमध्ये जाऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर हे बंड की गद्दारी या उपस्थित केलेल्या प्रश्नाला त्यांनी सावध प्रतिक्रिया देताना ही वेगळी भूमिका घेतली असल्याचे म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड पक्षप्रतोद, विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे?
अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची पक्षप्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे राज्याचा मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेताही एकाच ठाणे जिल्ह्यातील झाला आहे. हे दोन नेते एकाच जिल्ह्यातील असण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. नियुक्तीनंतर आव्हाड यांनी आपण आता मुख्य प्रतोद असल्याने माझा व्हीप त्यांना लागू होणार असल्याचे वक्तव्य केले आहे. तसेच या वयात बापाला अडचणीत आणणे माणुसकीला पटणारे नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर विरोधी पक्षनेतेपद आमदारांच्या संख्येनुसार काँग्रेसकडेही जाऊ शकते. कारण राष्ट्रवादीची ताकद आता कमी झाली असून काँग्रेस 45 आमदारांसह दुसरा मोठा पक्ष होणार आहे.
अजितदादांच्या सहकाऱ्यांना लॉटरी
दरम्यान, रविवारी दुपारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांच्यासह या आमदारांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. अजितदादांना जलसंपदा खात्याचेच मंत्रिपद दिले जाऊ शकते. याशिवाय त्यांच्याबरोबर आलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा, दिलीप वळसे पाटील यांना ऊर्जा, हसन मुश्रीफ यांना कौशल्य विकास, धनंजय मुंडे यांना गृहनिर्माण, आदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण, संजय बनसोडे यांना पर्यटन, अनिल पाटील यांना लाभक्षेत्र विकास, धर्मरावबाबा आत्राम यांना आदिवासी कल्याण मंत्रिपद दिले जाऊ शकते.
वर्षभरातच पुन्हा संघर्षाकडे वाटचाल
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात नाट्यामय घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत जाणार, अशा चर्चांमुळे संशयाच्या फेऱ्यात असलेले राष्ट्रवादी काँगेसचे दिग्गज नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. यामुळे राज्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि देशाला सत्तासंघर्ष पहायला मिळणार, अशी चिन्हे आहेत. पवार यांनीही शिंदे यांच्याप्रमाणेच आमचीच राष्ट्रवादी असा दावा केला आहे. तर जयंत पाटील यांनी त्याला विरोध दर्शवला आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड ठरली शेवटची काडी
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री झाले खरे तथापि तेव्हापासूनच त्यांची घुसमट मंत्रिमंडळ आणि पक्षातही होत होती. शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यामध्येही अजितदादांनी काहीशी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र शरद पवार यांनी राजीनामा मागे घेत पक्षाची धुरा प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवल्यावर अजितदादा आणखीनच नाराज असल्याचे दिसत होते. आपण विरोधी पक्षनेते पद सोडून देत असून पक्षाची संघटनात्मक जबाबदारी मिळावी, अशी वक्तव्येही त्यांनी केली होती. त्यांच्या एकूणच वर्तनावऊन ते प्रचंड नाराज असल्याचे तसेच त्यांची घुसमटही होत असल्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती. त्यामुळेच पक्षाच्या नव्या मांडणीमध्ये अजितदादांना डावलले गेल्याची घटना ही उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरली आणि अजितदादांनी अखेर बंडाचे पाऊल उचलले, असे राजकीय वर्तुळामध्ये म्हटले जात आहे.
राष्ट्रवादी म्हणूनच सत्तेत सहभागी : अजितदादा
आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच सत्तेत सहभागी होणार आहोत, पुढे देखील निवडणुका पक्षाच्या चिन्हासह लढणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका अजितदादांनी शपथ घेतल्यानंतर मांडली आहे. ही भूमिका आपल्याला साथ देणाऱ्या आमदारांना मान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, पक्षाच्या वर्धापनदिनीच आपण देशाला खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचे म्हटले होते. तऊणांना संधी देणेही आवश्यकच आहे. नवीन कार्यकर्ते पुढे आणले पाहिजेत, असा आपला प्रयत्न असेल. कोरोना कालावधीतही आपण विकास हीच भूमिका ठेवली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तिघे मिळून महाराष्ट्राला पुढे नेऊ : देवेंद्र फडणवीस
आम्ही तिघे मिळून महाराष्ट्राला पुढे नेऊ आणि विकास करू, असा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अजित पवार आणि मी, असे आम्ही तिघेही मिळून विकासाचा एक नवीन अध्याय लिहू आणि एक पुरोगामी सरकार, विकास देणारे सरकार आम्ही देऊ, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तथापि अधिक राजकीय भाष्य करणेही टाळल्याचे दिसून आले.
आता राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या गतीने : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. डबल इंजिन सरकार आहे, त्याला आणखी एक इंजिन जोडले गेले आहे. त्यामुळे आता राज्याचा विकास हा बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल. महाराष्ट्रातील जनतेला विकासाचा फायदा मिळेल. मंत्रिमंडळ विस्तारही आता तातडीने होईल, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.








