6.3 रिश्टर स्केल तीव्रता ः 6 ठार; दिल्लीसह पाच राज्ये हादरली
काठमांडू, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शेजारील देश नेपाळमध्ये मंगळवारी मध्यरात्री उशिरा 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. नेपाळसोबतच भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेशसह उत्तरेतील 5 राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक लोक घाबरून घराबाहेर पडले. या दुर्घटनेत नेपाळमध्ये डोटी जिह्यात घर कोसळून 6 जणांना जीव गमवावा लागला. पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी शोक व्यक्त केला आहे.
नेपाळ आणि भारतातील सीमावर्ती राज्यांमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर लष्कर मदत, शोध आणि बचावकार्यात गुंतले आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, नेपाळमध्ये 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 1ः57 वाजता भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र नेपाळमधील मणिपूरमध्ये जमिनीपासून 10 किमी खाली होते. नेपाळमध्ये काही भागात पडझड झाल्याचे वृत्त असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले.
भारतातही धरणीमाता हादरली
नेपाळ-भारत सीमेवर झालेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे भारतातही प्रभार दिसून आला. दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले. तसेच नेपाळमधील सीतामढीला लागून असलेल्या बिहारमधील मेजरगंज, सोनबरसा, सुरसंद, परिहार कान्होली, बेलासह अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये कुठलेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
उत्तर प्रदेशमध्ये लखनौसह अनेक जिह्यांमध्ये 8 नोव्हेंबरच्या रात्री 8.52 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.9 इतकी मोजली गेली. मेरठ, मुरादाबाद, लखनौमध्ये लोक घराबाहेर पडले. उत्तराखंडमध्ये पिथौरागढमध्ये 9 नोव्हेंबरला सकाळी 6.27 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी होती. राजस्थानमध्ये जयपूर, भरतपूर, अलवरसह 8 हून अधिक जिल्हय़ांमध्ये मध्यरात्री 1ः57 च्या सुमारास भूकंप झाला.
2015 मध्येही नेपाळमध्ये भूकंप
नेपाळमध्ये यापूर्वी 25 एप्रिल 2015 रोजी 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे मोठी जीवितहानी झाली होती. या विनाशकारी भूकंपात 9,000 हून अधिक लोकांचा मृत्यू आणि 23,000 हून अधिक लोक जखमी झाले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळपासून 38 किमी अंतरावर असलेल्या लामजुंग येथे होता. तसेच 1934 मध्ये नेपाळ आणि उत्तर बिहारमध्ये 8.0 तीव्रतेचा भूकंप होऊन 10,600 लोकांचा बळी गेला होता.









