3 रिश्टर स्केलच्या वर तीव्रता ः भूतान सीमेजवळचा भागही हादरला
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अरुणाचल प्रदेश आणि मध्यप्रदेशात रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम भागात रविवारी दुपारी 12.12 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, तर मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर लगेचच कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
मध्यप्रदेशातील अनेक जिह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताला हवामान खात्याने दुजोरा दिला आहे. दुपारी 12.54 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले. याची तीव्रता 3.0 इतकी नोंदवण्यात आली आहे. त्याचे हायपोसेंटर 10 किमी खोलीवर होते. बाधित जिह्यांमध्ये बरवानी, अलीराजपूर, धार याशिवाय इंदूर, झाबुआ आणि खरगोन या लगतच्या जिह्यांचा समावेश आहे.
अरुणाचल प्रदेशातील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या अहवालानुसार, 12 वाजून 12 मिनिटांनी बसलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू भूतान सीमेजवळील पश्चिम कामेंग येथे होता. तर त्यानंतर झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू इंदूरपासून 150 किमी अंतरावर असलेल्या धारमध्ये होता. त्याची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम भागात तसेच आसामच्या मध्य आणि उत्तर भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय पूर्वेकडील भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.









