अफगाणिस्तानात 5.8 तीव्रतेचा धक्का
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अफगाणिस्तानात शनिवारी दुपारी पुन्हा एकदा भूकंपामुळे दहशत निर्माण झाली. दुपारी 12:17 वाजता 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचा परिणाम जम्मू काश्मीर तसेच दिल्ली-एनसीआरमध्येही जाणवला. तथापि, या घटनेत अद्याप जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे धक्के जम्मू काश्मीरच्या बहुतांश भागात जाणवले. श्रीनगरमधील काही भागात लोक घरे आणि कार्यालयांमधून बाहेर पळताना दिसले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंप पृष्ठभागापासून 86 किलोमीटर खाली झाला. त्याचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती भागात होता. हा परिसर भूकंप संवेदनशील मानला जातो. या भागात भूकंप होणे सामान्य आहे. याआधीही मार्च महिन्यात दिल्ली-एनसीआर आणि जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते.









