6.3 रिश्टर स्केलच्या धक्क्याने विध्वंस
वृत्तसंस्था/ हेरात
अफगाणिस्तान भूकंपाच्या जोरदार धक्क्याने हादरले आहे. अफगाणिस्तानमध्ये 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असून त्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशाच्या पश्चिम भागात झालेल्या भूकंपात किमान 15 जणांना आपला जीव गमवावा लागला. तसेच 78 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे कोसळलेल्या इमारतींखाली अनेक लोक दबले गेल्याच्या वृत्तामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, असे प्रशासकीय पताळीवरून सांगण्यात आले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या अहवालानुसार शनिवार 7 ऑक्टोबर रोजी अर्ध्या तासाच्या कालावधीत देशात तीन जोरदार भूकंप झाले. तिसरा धक्का दुपारी 12.42 वाजता झाला. त्याची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. पहिला भूकंप दुपारी 12:11 वाजता झाला, ज्याची तीव्रता 6.1 होती. तर दुसरा भूकंप दुपारी 12:19 वाजता नोंदवला गेला. त्याची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. या धक्क्यांमुळे घरे-इमारतींची पडझड झाल्यामुळे जीवितहानीची नोंद झाली आहे. मृतांची संख्या आतापर्यंत मध्यवर्ती ऊग्णालयात आणलेल्या मृतदेहांवर आधारित आहे, परंतु ती अंतिम आकडेवारी नाही. लोक ढिगाऱ्याखाली दबले असल्याची माहिती आमच्याकडे आहे, असे हेरात प्रांताचे सार्वजनिक आरोग्य संचालक मोहम्मद तालेब शाहिद यांनी सांगितले. मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.