धक्के जाणवताच लोक घाबरून पळाले घराबाहेर
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानमध्ये सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी नेंदविण्यात आली. पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये धक्के जाणवल्यानंतर घाबरलेले लोक घरे सोडून रिकाम्या जागी पळू लागले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र 10 किलोमीटर खोलीवर होते. भूकंपाचे हे धक्के खैबर-पख्तूनख्वा येथे जाणवले. गेल्या आठवडाभरात पाकिस्तानमध्ये तीनवेळा भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. 30 एप्रिल 2025 रोजीही पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. त्यानंतर शनिवार, 3 मे रोजी 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर आता सोमवारी तिसऱ्यांदा 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे जाणवले.









