चिपळूण :
पावसाळ्यात खेर्डीसह चिपळूण शहरात भरणाऱ्या पुराला कारणीभूत असलेला मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील ब्रिटीशकालीन पूल तोडला जात आहे. दोन पुलाच्या मधोमध असलेला मातीचा भराव काढून तो पूररेषेतीलच खासगी जागेत टाकला जात असल्याने अखेर कळंबस्ते ग्रामपंचायतीने त्याला हरकत घेत काम थांबवले आहे.
2005 च्या महापुरानंतर बहादूरशेखनाका येथील जुना पूल चर्चेत आला होता. मात्र 2021 मधील महापुरात वाशिष्ठी नदीवरील या दोन्ही पुलामध्ये असलेला मातीचा भराव वाहून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा भराव टाकून महामार्ग सुरळीत करण्यात आला. 2021च्या महापुरानंतर हा पूल तोडण्याची मागणी जोर धरू लागली. या पुलामुळे दसपटीकडून येणारे पाणी अडून त्याचा फुगवटा खेर्डीसह शहरात मारत असल्याने हा पूल तोडण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा पूल तोडण्यासाठी निविदा काढली. त्यानुसार गेल्या महिन्यापासून हा पूल तोडण्यास सुरुवात झाली आहे. या नदीवर मधोमध मातीचा भराव असल्याने पुलाची विभागणी झाली आहे. सध्या एका बाजूचा पूल तोडल्यानंतर आता मधोमध असलेला भराव काढण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, काढण्यात येत असलेला मातीचा भराव कळंबस्ते येथील खासगी जागेत टाकला जात आहे. मात्र भराव टाकण्यात असलेली जागा पूररेषेत असल्याने त्याला कळंबस्ते ग्रामपंचायतीने अटकाव केला आहे. यासंदर्भात या ठेकेदारासह महामार्ग विभागाला भराव न टाकण्यासंदर्भातील पत्र सादर केले आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या हरकतीनंतर सद्यस्थितीत भरावाचे काम बंद करण्यात आले आहे.
- पूररेषेतील भरावाला विरोध
एकीकडे पूररेषेत कुठलीही बांधकामे करू नयेत, मातीचे भराव करू नयेत, अशी नियमावली प्रशासनाकडून दाखवली जात असताना दुसरीकडे कळंबस्तेतील खासगी जागेत आणि तेही पूररेषेत भराव कसा टाकला जातो, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का? त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महामार्ग उपविभागाला भराव थांबवण्याचे पत्र दिल्याचे कळंबस्ते ग्रामपंचायत सरपंच विकास गमरे यांनी सांगितले.








