आपण प्रत्येकजण ‘पोटासाठी’ कमाई करत असतो. पण तरीही आपले पोट सुटू न देण्याचा प्रयत्नही करत असतो. अलिकडच्या काळात तर शरीरस्वास्थ्याविषयीची जाणीव आणि संवेदनशीलता खूपच वाढली असून लोक सजग झाले आहेत. त्यामुळे पोटासाठी कमाई करताना पोट हा अवयव दुर्लक्षित केला जात नाही. तथापि, अमेरिकेत राहणारे 46 वर्षीय ब्रायन स्टील यांनी कमाई करण्याचा एक अनोखा मार्ग शोधून काढला आहे. पोटासाठीं कमाई त्यांनी चक्क आपले प्रचंड सुटलेले पोट ‘दाखवून’ करण्यास प्रारंभ केला आहे.

त्यांचे वजन 158 किलो आहे. अर्थातच, त्यांचे पोटही या वजनाला शोभेल असे प्रचंड आहे. त्यांचा आहारही भरभक्कम आहे. आहारातून ते प्रतिदिन 12,000 कॅलरीज मिळतील, इतका ऐवज ते पोटात ढकलतात. व्यायाम सोडाच, फारशी हालचालही करत नाहीत. मग ते इतके खाण्यासाठी कमाई कशी करतात असा प्रश्न आपल्या मनात उमटल्याशिवाय राहणार नाही. कमाईसाठी त्यांनी चक्क आपल्या दांडग्या पोटाचेच प्रदर्शन मांडले आहे. असे मोठय़ा भोपळय़ापेक्षाही मोठे पोट पाहण्यासाठी दुरुन दुरुन लोक येतात. पोट दाखविण्यासाठी स्टील यांनी ‘फी’ लावली आहे. या फीच्या संकलनातून त्यांचे पोट भरते.
आता त्यांना आपले पोट आणखी वाढवायचे आहे. त्यासाठी जास्त खाण्याची आवश्यकता आहे. कारण, आपला पोटप्रदर्शनाचा ‘धंदा’ त्यांना बंद पडू द्यायचा नाही आहे. पण तेवढय़ाच आकाराचे पोट पाहून लोक कंटाळू नयेत आणि आपल्या पोटाची लोकप्रियता कमी होऊ नये म्हणून त्यांना ते आणखीं वाढवायचे आहे. जोपर्यंत आपल्याला या महापोटाचा त्रास होत नाही, तो पर्यंत ते वाढते ठेवण्याचा त्यांचा विचार आहे. कमाईचा हा मार्ग अद्भूतच आहे.









