कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
‘कमवा व शिका’ ही योजना शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी 1967 साली सुरू केली. पहिल्या वर्षी या योजनेत 25 विद्यार्थांनी सहभाग नोंदवाला. 2004-2005 पासून या योजनेतून मुलींनाही प्रवेश दिला जात आहे. सध्या कमवा व शिका योजनेत 120 विद्यार्थिनींना तर 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता आहे. त्यापैकी 109 विद्यार्थिनी तर 70 विद्यार्थी कार्यरत आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केल्याप्रमाणे कमवा व शिका योजनेचे सशक्तीकरण होईल. विद्यार्थ्यांसाठी आधारवड ठरणाऱ्या या योजनेतील विद्यार्थी संख्या वाढीबरोबर मानधन वाढ विद्यार्थ्यांच्या आनंदात भर पाडणारी आहे.
शिवाजी विद्यापीठातील कमवा व शिका या योजनेचे पहिले मानद अधीक्षक चंद्रकुमार नलगे तर पहिले अधिकृत अधीक्षक भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. मुरलीधर डोंगरे होते. या योजनेच्या माध्यमातून सुरूवातीला विद्यार्थी विद्यापीठात शेती करीत होते. विद्यापीठातील अतिथी विश्रामगृहापासून ते क्रीडा विभागापर्यंत ऊस लागण केली जायची. तसेच बाभुळ बनातही मिर्ची, भात, ज्वारी यासह अन्य पिकांची लागन केली जात होती. या पिकांचा वापर वसतिगृहातील मेससाठी केला जायचा. तसेच युको बँकेजवळ ‘हायवे कँटीन’ही विद्यार्थी चालवत होते. यामधील मिसळ फेमस होती. बदलत्या काळानुसार आता विद्यार्थ्यांना वसतिगृहातील मेस, झेरॉक्स सेंटर आणि प्रशासकीय इमारतीतील अॅकॅडमीक काम दिली जातात. कमवा व शिका योजनेत काम करणारे शेकडो विद्यार्थी प्राध्यापक, संशोधक, प्रशासकीय अधिकारी झाले आहेत. याच योजनेतून शिक्षण घेणारे डॉ. एस. एम. पठाण नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू, व डॉ. एस. एच. पवार डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू झाले आहेत. कमवा व शिका योजनेत शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यापीठात प्राध्यापक झाल्यामुळे याच योजनेतील वसतिगृहाचे अधीक्षकही झाले आहेत. यातून ही योजना विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरत आहे.
कमवा व शिका योजनेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ. आप्पासाहेब पवार कमवा व शिका विद्यार्थी प्रबोधिनीची स्थापना केली. या प्रबोधिनीच्या माध्यमातून डॉ. जी. पी. माळी, डॉ. नीलेश तरवाळ, प्रा. टी. के. सरगर संपादित 65 लेखांचा आधारवड स्मृतीग्रंथ प्रकाशित झाला. तसेच भैरव कुंभार संपादित श्रमजिवी लेखसंग्रहही प्रकाशित झाला. यामध्ये या योजनेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कमवा व शिका योजनेमुळेच शेकडो विद्यार्थ्यांना विद्यापीठातील उच्च शिक्षण घेता आले. या विद्यार्थ्यांनी देश–विदेशात आपल्या विद्यापीठाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.
- विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा
विद्यापीठातील कमवा व शिका योजनेत प्रतितास 30 रुपये असे दिवसाला तीन तासाचे 90 रुपये दिले जातात. यातून विद्यार्थ्यांच्या राहण्याचा, जेवनाचा खर्च होतोच, परंतू 20 रुपयात कोणत्याही अधिविभागात प्रवेश व 60 रुपयात परीक्षा अर्ज भरला जातो. विद्यापीठातील हेल्थ सेंटरमध्ये आरोग्यविषयक सर्व सुविधा मोफत पुरवल्या जातात. विद्यार्थ्यांना वर्षभरात फक्त 10 सुट्ट्या दिल्या जात असल्याने विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ अभ्यास करून ध्येयापर्यंत झेप घेतात.
- कमवा व शिका योजना कार्यरत विद्यार्थी व मिळणारे मानधन
विद्यार्थी संख्या विद्यार्थीनी संख्या प्रतिदिवस मानधन प्रतिमहिना मानधन
70 109 90 रुपये 2700 रुपये
- महागाईच्या दुनियेत मानधन वाढवण्याची गरज
महागाईमुळे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनातून त्यांचा खर्च करणे अवघड झाले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन कमवा व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांना प्रतिदिन 50 रुपये देण्याचा विचार करीत आहे. त्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी कामाच्या तासाबरोबर मानधन वाढवण्याच्या सूचना दिल्यामुळे विद्यार्थी भवनला हातभार लागणार आहे. या खर्चातून मेसमधील स्वयंपाक करणारे कर्मचारी, ऑफिसमधील लिपिक, शिपाई, वॉर्डन यांचे वेतनही द्यावे लागते. त्यामुळे मानधन वाढीचा निर्णय स्वागतार्ह
डॉ. दीपक भादले (अधीक्षक, विद्यार्थी भवन)








