आयुक्त-उपायुक्तांचा पुढाकार, तीन चाकू, तंबाखूच्या पुड्या जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहावर बेळगाव पोलिसांनी शनिवारी भल्या पहाटे छापा टाकला आहे. कारागृहात तपासणी करण्यासाठी तब्बल अडीचशे हून अधिक पोलीस व अधिकाऱ्यांना झुंपण्यात आले होते. तपासणीत काही किरकोळ वस्तू वगळता इतर आक्षेपार्ह असे काहीच हाती आले नाही.
पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून शनिवारी पहाटे पाचपासून तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत तब्बल 40 हून अधिक पोलीस अधिकारी व 220 हून अधिक पोलीस सहभागी झाले होते.
हिंडलगा मध्यवर्ती कारागृह नेहमी या-ना त्या कारणाने चर्चेत असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याच कारागृहातून खंडणीसाठी धमकाविण्यात आले होते. त्यानंतर केवळ कर्नाटकातच नव्हे तर देशभरात हे कारागृह ठळक चर्चेत आले. महाराष्ट्र पोलिसांनी हिंडलगा कारागृहातून जयेश पुजारी या कैद्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आहे.
या घटनेनंतर अनेकवेळा कारागृहात तपासणी करूनही पोलीस यंत्रणेला मोबाईल किंवा इतर आक्षेपार्ह असे काहीच सापडले नाही. शनिवारी तीन चाकू, तंबाखूच्या दहा पुड्या, एक सिगारेट, लहान वॉटर हिटर, वायर बंडल, इलेक्ट्रिक स्टोव्ह आढळून आले आहे. यासंबंधी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात सरकारतर्फे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कारागृहात तपासणी करण्यासाठी श्वान पथक व स्फोटक शोधक पथकाचाही वापर करण्यात आला. यापूर्वी अनेकवेळा तपासणी करूनही म्हणावे तसे काही मिळाले नव्हते. शनिवारीही काही किरकोळ वस्तू वगळता पोलिसांच्या हाती ठोस असे काहीच लागले नाही. त्यामुळे डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढण्याचा हा प्रकार ठरला आहे.









