ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांच्याकडूनच असाच दावा
वृत्तसंस्था/ पाटणा
विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आगामी लोकसभा निवडणूक मुदतीपूर्वीच होण्याची शक्यता वर्तविली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मुदतपूर्व लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी देखील अशाच प्रकारचा दावा केला आहे.
लोकसभा निवडणूक कधीही होऊ शकतात. लोकसभा निवडणूक ठरलेल्या मुदतीतच व्हाव्यात हे आवश्यक नाही. वैयक्तिक स्वरुपात मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. आमचे काम अधिकाधिक विरोधी पक्षांना आघाडीत सामील करणे हेच असल्याचा दावा नितीश कुमार यांनी केला आहे.
भाजपवर भरवसा ठेवता येत नाही. भाजप डिसेंबर किंवा जानेवारीत निवडणूक करवू शकतो. भाजपने सरन्यायाधीशांना मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्त करण्याच्या समितीतून हटविले असल्याचे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी केले होते.
स्टॅलिन यांचा दावा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावर भाजप पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला मुदतीपूर्वीच घेण्याचा निर्णय करवू शकतो असा दावा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केला होता.









