नागरिकांकडून प्रतिसाद नसल्याने ठोकले टाळे
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात ओला आणि सुका कचरा जमा करण्याबरोबरच ई-वेस्ट जमा करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली होती. तसेच ई-वेस्ट जमा करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले कलेक्शन सेंटरदेखील उभारण्यात आले आहे. मात्र सहा महिन्यातच ही मोहीम गुंडाळण्यात आली असून ई-वेस्ट इतरत्र टाकले जात आहे. त्यामुळे उभारण्यात आलेले ई-वेस्ट कलेक्शन सेंटर वेस्ट बनले आहे.
शहरात ओला आणि सुक्मया कचराची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती होते. त्यामुळे घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केली जाते. यामध्ये ई-वेस्ट देखील मोठय़ा प्रमाणात टाकण्यात येते. शहरात संगणक तसेच विद्युत उपकरणांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. प्रत्येक ठिकाणी अत्याधुनिक यंत्रांचा वापर केला जातो. विशेषतः प्रत्येकाच्या हातात मोबाईल, संगणक त्याचप्रमाणे घरोघरी विजेवर चालणारी उपकरणे वापरली जातात. विशेषतः तयार करण्यात येणारी विजेवर चालणारी यंत्रोपकरणे नादुरूस्त झाल्यास कचऱयामध्ये टाकली जातात. त्यामुळे ई-वेस्ट जमा करण्यासाठी महापालिकेने खासबाग कचरा डेपो शेजारी ई-वेस्ट कलेक्शन सेंटर सुरू केले आहे. तसेच आठवडय़ातून दोन दिवस वेगवेगळय़ा भागातील ई-वेस्ट जमा करण्यासाठी वाहनांची नियुक्ती केली होती. मात्र ई-वेस्ट जमा करण्याच्या मोहिमेस शहरवासियांकडून म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही.
ईमारत बांधकामही वाया
महापालिकेच्या अपेक्षेप्रमाणे ई वेस्ट जमा झाले नाही. त्यामुळे शहरात ई-वेस्ट जमा करण्यासाठी सुरू केलेली वाहने बंद केली. केवळ खासबाग येथील ई-वेस्ट केंद्रात कचरा जमा करण्याचे आवाहन क्केले होते. मात्र या सेंटरलादेखील कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने हे केंद्र बंद केले आहे. ई-वेस्ट कलेक्शन सेंटर उभारण्यासाठी मनपाने तातडीने इमारतीचे बांधकाम केले. पण हे ई-वेस्ट कलेक्शन सेंटर आता वेस्ट बनले आहे.









