केंद्रीय राज्यमंत्री जितीन प्रसाद यांची माहिती : अर्थसंकल्पातील ठळक मुद्यांवर केले भाष्य
पणजी : केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींचा गोमंतकीय मच्छीमार, लहान उद्योजक, शेतकरी, आणि पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक आदी घटकांना मोठा लाभ मिळणार आहे, असा विश्वास केंद्रीय उद्योग आणि व्यापार खात्याचे राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी व्यक्त केला आहे. दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आलेले श्री. प्रसाद यांनी गुऊवारी पणजीत भाजप मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील ठळक मुद्यांवर भाष्य केले. पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचीही उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री. प्रसाद यांनी विदेशी पर्यटकांसाठी ई-व्हिसा सुविधा सुलभ करण्यासाठी सरकार काम करत असल्याचे सांगितले.
गोवा हे प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने विविध राज्यांमध्ये खासगी सरकारी भागिदारीतून क्रूझ पर्यटन, जैव पर्यटन तसेच वारसा स्थळांच्या पुनर्विकासासह 50 पर्यटन स्थळे विकसित करण्यात येतील, असे ते म्हणाले. वार्षिक 12 लाख ऊपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकरात सूट दिल्याने लाखो लोकांना फायदा होईल, त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मध्यमवर्गीयांना अधिक खर्च करण्यास प्रोत्साहन मिळेल. असा हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीय आणि पगारदार व्यक्तींना प्राधान्य देणारा असल्याचे स्पष्ट होत आहे, त्यामुळे हा अर्थसंकल्प ऐतिहासिक होता, असे प्रसाद यांनी सांगितले. त्याचबरोबर भारताला उत्पादन केंद्र बनवणे, निर्यात वाढविणे आणि आयात कमी करणे ही उद्दिष्टे साध्य करणे शक्य होईल. एमएसएमई क्षेत्राला देण्यात येणारी कर्जाची रक्कम 10 कोटी ऊपयेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचा फायदा राज्यातील लहान उद्योजकांसह देशभरातील सर्व उद्योजकांनाही होणार आहे.
अर्थसंकल्पात पर्यटनावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक पर्यटन स्थळांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाला अर्थिक पाठिंबा मिळत आहे. देशाच्या औषधनिर्मिती क्षेत्रात गोव्यातील फार्मा उद्योगाचा 12 टक्के वाटा असून या अर्थसंकल्पामुळे गोव्यातील फार्मा उद्योगालाही प्रोत्साहन मिळणार आहे, असे प्रसाद यांनी नमूद केले. अर्थसंकल्पांतून मध्यमवर्गीय, महिला, युवा, शेतकरी आणि गरीब लोकांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. भारताला जागतिक फूड बास्केट बनविण्याचाही उद्देश अर्थसंकल्पात असून त्याचा फायदा शेतकरी, दूग्ध उत्पादक, मच्छीमार आदी समुदायांना होणार आहे. सध्या जागतिक अस्थिरतेच्या काळांतही आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लवकरच आम्ही तृतीय स्थानी पोहोचणार आहोत, असा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला.









