पुणे / प्रतिनिधी :
‘डीआरडीओ’चे संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानातून इ-मेल पाठविण्यात आल्यानंतर त्या इ-मेलला कुरुलकर यांनी प्रतिसाद दिल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. कुरुलकर यांच्या कोठडीत १५ मेपर्यंत वाढ करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले आहेत.
पाकिस्तानाला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप कुरुलकर यांना मंगळवारपर्यंत (९ मे) एटीएस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले होते. कुरुलकर यांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायालयाच्या आवारात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुरुलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर एटीएसकडून करण्यात आलेल्या तपासाबाबतचा माहिती अहवाल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी सादर केला. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असून कुरुलकर यांच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती एटीएसकडून विशेष न्यायालयाकडे करण्यात आली.
कुरुलकर यांना पाकिस्तानातून काही इ-मेल पाठविण्यात आले आहेत. या मेलला त्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांनी पाकिस्तानातील आयपी ॲड्रेसवर मेल केल्याची माहिती गुगलने दिलेल्या अहवालातून उघड झाली आहे. कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षेला बाधा आणणारी काही छायाचित्रे पाठविल्याचा संशय आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटाॅप आणि मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून याबाबतचा अहवाल एटीएसला मिळाला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानवडे यांनी न्यायालयात सांगितले.
दरम्यान, सरकार पक्षाकडून सरकारी वकील ॲड. विजय फरगडे यांनी तपासासाठी कुरुलकर यांच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती युक्तीवादात केली. कुरुलकर यांचे वकील(बचाव पक्ष) ॲड. ऋषीकेश गानू यांनी बाजू मांडली. एटीएसकडून कुरुलकर यांची चौकशी करण्यात आली आहे. ते तपासात सहकार्य करत आहेत. कुरुलकर यांच्याकडे शासकीय (डिप्लोमॅट) आणि वैयक्तिक अशी दोन पारपत्रे आहेत. शासकीय कामासाठी ते परदेशात गेले होते. याबाबतची शासकीय प्रक्रिया त्यांनी पार पाडली होती. वरिष्ठांना कल्पना देऊन तसेच तशी नोंद करुन कुरुलकर परदेशात गेले होते. कुरुलकर यांची चौकशी पूर्ण झाली आहे. कोठडीची गरज नाही, असे ॲड. गानू यांनी युक्तीवादात नमूद केले.








