94 टक्के काम पूर्ण : किसान सन्मान योजनेतील अडथळा दूर : कृषी खात्यालाही मिळाला दिलासा
बेळगाव : शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पीएम किसान ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 5 लाख 64 हजार 784 शेतकऱ्यांपैकी 5 लाख 28 हजार 920 शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे. आतापर्यंत ई-केवायसीचे 94 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सर्रास शेतकऱ्यांना शासकीय योजना सुरळीत मिळणार आहेत. जिल्ह्यात 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची संख्या आहे. यामध्ये अल्प आणि अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. मात्र काही शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नव्हती. त्यामुळे निधी मिळताना अडचणी येत होत्या. मात्र ई-केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांचे हप्ते सुरळीत झाले आहेत. कृषी खात्याने ई-केवायसी करण्यासाठी आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले आहे. उर्वरित 6 टक्के शेतकऱ्यांनी तलाठी, पीकेपीएस किंवा रयत संपर्क केंद्रात ई-केवायसी करावी, असे आवाहनही करण्यात आले. यंदा खरीप हंगामातील अडीच लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. नुकसानग्रस्त भागाला केंद्रीय पथकांनी भेट देऊन अहवाल सादर केला आहे. या शिवाय इतर सर्व शासकीय योजना आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. जिल्ह्यात ई-केवायसीचे काम पूर्णत्वाकडे आल्याने कृषी खात्यालाही दिलासा मिळाला आहे. मागील वर्षभरापासून ई-केवायसी करून घ्यावी, यासाठी कृषी खात्याकडून सातत्याने आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे.
पीएम किसान सन्मान निधी सुरळीत मिळणार
जिल्ह्यातील ई-केवायसीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. 94 टक्के शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण झाली आहे. त्यामुळे शासनाच्या योजना राबविताना कोणताही अडथळा येणार नाही. त्याबरोबर पीएम किसान सन्मान निधीदेखील सुरळीत मिळण्यास वाव मिळणार आहे.
शिवनगौडा पाटील-सहसंचालक कृषी खाते









