सध्या इडी या शब्दाला खूपच महत्त्व आले आहे. लोक राजकारणात गेल्यानंतर जे जे काही भ्रष्टाचार करतात त्याचा शोध घेण्याचे काम या ठिकाणी होतं. पण जगातल्या सगळ्याच लोकांच्या मागे इडी केव्हाच लागलेलं असतं हे आमच्या लक्षात येत नाही. हे इडी लागल्यानंतर पुढे जवळजवळ वीस वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा सुरू असतेच आणि वेगवेगळ्या माहितीच्या अधिकाऱ्यांना सामोरे जायला लागतं. अनेक चौकशांना, परीक्षांना सामोरे जायला लागतं. असं इडी (एज्युकेशन)मला वयाच्या तिसऱ्या वर्षापासून लागलेलं आठवतं. यावेळी मात्र सोहळा असतो, घरातले सगळे लोक नटून थटून आम्हालाही नवीन कपडे घालून एका विशिष्ट कारागृहात नेतात. ते कारागृह खूप छान छान चित्राने, फुग्यांनी सजवलेले असतं, जिथे सुरुवातीला मुलांना रमावसं वाटायचं असं ते ठिकाण म्हणजे शाळा. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर काहीतरी विचित्र प्रश्न विचारले जायचे. मलाही असाच एक प्रश्न एका बाईंनी विचारला. हम्मा कशी ओरडते ते सांग? एवढ्या मोठ्या बाईला हम्मा कशी ओरडते हेच माहिती नसावं याचं मला हसू आलं. मी आईला लगेच सांगितलं …ही वेडीच दिसते. अशा प्रकारे पहिलाच दणका या इडीच्या अधिकाऱ्यांना मी दिला. तिथे गेल्यावर मला फळ्यावर चित्र काढायला खडू दिला, मी सहज तो तोंडात घातला अन् हळूहळू संपवला देखील. इतका चांगला खाण्याचा पदार्थ लिहिण्यासाठी का वापरतात याचा मला अगदी राग आला. नंतर मात्र या इडीच्या कार्यालयात जाताना मला अगदी नको वाटायचं. एक तर ते सांगतील तसं तसं आम्हाला करायला लागायचं, आमच्या आवडीचं काहीच करता यायचं नाही. या इडीच्या कार्यालयात शहरात आणि खेड्यात वेगवेगळी ट्रीटमेंट असायची. खेड्यातल्या मुलांना या कार्यालयात जातांना फारसा फरक पडत नसायचा कारण गणवेशाची सक्ती नसायची. ओळखीचेच मास्तर असायचे आणि ते हाणतील या विचाराने ते सांगतील तसे त्यांच्या मागे आम्ही म्हणत राहायचो. एक मात्र चांगलं होतं या कार्यालयाला रविवारी आणि सणावाराला मात्र सुट्टी असायची. पण चौकशी मात्र कायम सुरूच असायची. या कार्यालयात गेलं की एखादा फायलीऐवजी पुस्तक उघडून शिक्षक प्रश्न विचारून जसे भंडावतात तसेच घरी आल्यावर पालक देखील शाळेत काय झालं? काय शिकवलं? हे विचारून भंडावून सोडतात. असं हे इडी म्हणजे एज्युकेशन अगदी लहानपणापासून आमच्या मागे लागलं. इडीच्या कार्यालयाची, म्हणजे शाळेची रचना काहीशा फरकाने कारागृहासारखीच असायची. बाहेर जाता यायचं नाही, पळून गेलं तर शिक्षा व्हायची, पण त्यांच्या कारवाईला मात्र सामोरे जायला लागायचं. परीक्षेच्या काळात ही कारवाई फारच कठीण असायची, नाकात अगदी दम यायचा. इथले विषय एखाद्या वॉर्डनसारखे रात्री स्वप्नातसुद्धा अंगावर धावून यायचे. या कार्यालयातून कुठल्याही कोर्टात दाद मागण्याची सोय नव्हती. एक मात्र चांगलं होतं, इथे पाठवतांना वडिलांच्या खिशातले पैसे सरकार काढून घेत असे. आमचे पैसे जरी जात नसले तरी वेळ मात्र फार वाया जात होता. या कार्यालयात तिथले अधिकारी जे सांगतील तेच करायला लागायचं. काहीही करायचं स्वातंत्र्य नसायचं. अशातच बऱ्याचदा इतर मुलांशीदेखील आमची हाणामारी व्हायची, कधीतरी मैत्री पण व्हायची पण शेवटी हा सगळा प्रवास दहावीच्या परीक्षेला संपायचा. पुढे कॉलेज नावाचं मोठं मुक्त कारागृह मिळायचं इथे मात्र वरवर आपण स्वतंत्र असल्यासारखं वाटत जरी असलं तरीही चौकशा आणि परीक्षा यांचा पगडा कायम होताच. इथे एक मात्र चांगली गोष्ट होती छान छान मुलीदेखील इडीच्या निमित्ताने डोळ्यांना दिसायच्या. तेवढीच हिरवळ पाहतांना मनाला आनंद व्हायचा. असा इडी म्हणजे एज्युकेशन आम्ही नेमकं कशासाठी घेतोय हे आमचं आम्हालाच बरेचदा कळत नसायचं. शेवटी शिक्षणानुसार कुठेतरी नोकरी लागायची, लग्नं व्हायची, मुलं बाळ व्हायची. म्हणजे इडीचा बराच उपयोग होत होता. ताठ मानेनं जगता येत होतं. या इडीकडून आम्हाला जगण्यासाठी नोकरीसाठी एक सर्टिफिकेट दिलं जात असायचं. सन्मानानं डिग्री देऊन घरी पाठवलं जायचं. म्हणजे एकूण सगळं आयुष्याच आमचं या इडीच्या प्रभावाखाली जातं असं म्हणायला हरकत नाही. ज्यांना कोणाला वेगळा इडी लागला असेल त्यांनी त्यांचं बघावं, ते त्यांचं अती एज्युकेशन घेतल्यामुळे आणि अति विद्वत्ता असल्यामुळे, अती संपत्ती गोळा केल्यामुळे ते सगळं त्यांच्या मागे लागलेलं असतं. आम्ही मात्र सामान्य मुलांप्रमाणे एज्युकेशन इडीला आमच्या अंगा खांद्यावर मिरवत समाजात वावरत असतो पण हा इडी आमच्या मागे लहानपणीच लागलेला असतो हे मात्र खरं.
Previous Articleनिरपेक्ष वृत्तीने कर्मे करणारा ईश्वराला प्रिय होतो
Next Article संविधान हत्या दिनविरोधी याचिका फेटाळली
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








