जनजागृती झाल्यानंतरच होणार कार्यान्वित : वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती
पणजी : ‘ई चलन’ प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी पुरेशी जनजागृती होणे आवश्यक आहे. ती जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ई चलन पद्धती सुरू करणार नसल्याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या 22 मे पासून सुरू करण्यात येणारी ई चलनची कार्यवाही पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘ब्ल्यू कॅब’ काऊंटर येत्या दोन आठवड्यात सुरू करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आल्तिनो पणजी येथील निवासस्थानी मोपा विमानतळावर ‘ब्ल्यू कॅब’ काऊंटर सुरू करण्याबाबत बैठक झाली. त्यात विमानतळ कंपनी जीएमआरचे सीईओ एस. शेषन, पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, मंत्री गुदिन्हो व डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह इतर संबंधित मान्यवर उपस्थित होते.
ई प्रणाली समजून घ्यावी !
बैठकीनंतर बाहेर पत्रकारांशी बोलताना गुदिन्हो यांनी वरील महिती देऊन सांगितले की, ई चलन प्रणाली तातडीने अचानक सुरू केल्यास वाहन चालकांचा गोंधळ होण्याची तसेच त्यांना चीड येण्याची शक्यता आहे. म्हणून पुरेशी जनजागृती झाल्यानंतरच ई चलन सुरू करण्याचा सरकारचा इरादा आहे. त्याचे पुरेसे सूचना फलक लावण्यात येणार असून जनतेने ती प्रणाली समजून घ्यावी, असे आवाहन गुदिन्हो यांनी केले.
मोपावर लवकरच ‘ब्ल्यू कॅब’ काऊंटर
मोपा विमानतळावर ब्ल्यू कॅब काऊंटर सुरू करण्याची प्रक्रिया चालू आहे. एकदोन दिवसांत ते काम होण्यासारखे नाही. त्यासाठी वेळ लागणार आहे. संबंधितांनी त्याची प्रक्रिया काय आहे, याची माहिती घ्यावी. ब्ल्यू कॅब काऊंटर सुरू करण्यासाठी अधिसूचना काढण्याची तसेच मोटर वाहन कायद्यात बदल करण्याची गरज आहे. शिवाय जीएमआर कंपनीची अनुमती हवी. ती मिळाली असून आता पुढील प्रक्रिया लवकर करण्यासाठी निर्देश देण्यात आल्याचे गुदिन्हो म्हणाले.
पेडणे तालुक्यातील टॅक्सीचालकांना प्राधान्य
‘ब्ल्यू कॅब’ हा प्रीपेड काऊंटर करण्यात येणार असून तेथे पेडणे तालुक्यातील टॅक्सीचालकांना प्राधान्याने परवाने देण्यात येणार आहेत. यापूर्वी पेडण्यातील 160 जणांनी नोंदणी केली असून नंतर सुमारे 60 जणांचे अर्ज आले असल्याची माहिती गुदिन्हो यांनी दिली. मोपा विमानतळ सुरू झाल्यावर दाबोळी बंद पडणार, अशी भीती होती. आता तर विमान वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून मोपावरून 20 ते 22 नवीन ठिकाणे हवाई मार्गाने जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मतदान सुटीवरून विनाकारण गोंधळ
गोव्यात असलेल्या कर्नाटकातील मतदारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्यावरून विरोधक विनाकारण गोंधळ घालून त्या विषयाचा बाऊ करतात आणि जनतेची दिशाभूल करतात, असे ते म्हणाले. गोव्यात निवडणूक झाली तेव्हा महाराष्ट्र, कर्नाटकातील सरकारने तेथे काम करणाऱ्या गोवेकरांना भरपगारी सुटी दिली होती, हे गुदिन्हो यांनी निदर्शनास आणले.









