इलेक्ट्रिक बसेसना चार्जिंग-पार्किंग सुविधा पुरविण्याची योजना : जिल्हा प्रशासन प्रयत्नशील
बेळगाव : बेळगाव शहर हे सार्वजनिक वाहतूक सुविधांना महत्त्वपूर्ण चालना देणारे प्रमुख ठिकाण आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत निर्माण करण्यात आलेले अत्याधुनिक सुविधांनीयुक्त नूतन बसस्थानकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांनी बेळगाव शहरासाठी लवकरच 100 इलेक्ट्रिक बसेस पुरविणार असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर नूतन बसस्थानकाच्या मागील असलेल्या 5.5 एकर जागेत इलेक्ट्रिक बसेससाठी नूतन बसस्थानक निर्माण करण्यात येणार असल्याचे समजते.
केंद्र सरकारच्या पीएम-ई ड्राईव्ह उपक्रमांतर्गत बेळगावसाठी 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. यामुळे इलेक्ट्रिक बसेसच्या ताफ्यासाठी चार्जिंग व पार्किंगची सुविधा नूतन बसस्थानकाच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. केंद्र सरकारने शहरी प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने पीएम-ई ड्राईव्ह योजना अंमलात आणली आहे. यामुळे शहराला मिळणाऱ्या 100 इलेक्ट्रिक बसेसमुळे शहरी प्रदूषण कमी होण्यास एकप्रकारे मदत होणार असून वाहतूकही सुखकर व आरामदायी होणार आहे.
नूतन बसस्थानकाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी पुढीलवर्षी बेळगावमध्ये इलेक्ट्रिक बस सुविधा सुरू होणार असल्याचे सांगितले होते. इलेक्ट्रिक बसेससाठी 18 कोटी अनुदानातून ई बस स्टँड निर्माण करण्यात येणार असून केंद्र व राज्य सरकारच्या समान निधीतून साकारण्यात येणार आहे. ई बसस्टँडसाठी आधीच जागेची पाहणी करण्यात आली असून लवकरच काम सुरू होण्याची शक्यता आहे. लवकरच कामाची निविदा काढण्यात येणार आहे.
यावर्षीच्या प्रारंभी परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिल्ली येथे केंद्रीय उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेऊन राज्यात पीएम-ई ड्राईव्ह योजनेंतर्गत शहरी भागात इलेक्ट्रिक बसेसच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. याची दखल घेऊन वायव्य परिवहन विभागासाठी 700 बसेस मंजूर करण्यात आल्या असून बेळगावसाठी 100 इलेक्ट्रिक बसेस पुरविण्यात येणार आहेत. यामुळे बेळगाव शहर हे राज्यातील प्रमुख शहरांपैकी एक असल्याचे यातून दिसून येते. तसेच या सुविधेमुळे बेळगावच्या विकासातही भर पडणार आहे.
बेळगावसाठी 100 बसेस…
पीएम ई ड्राईव्ह योजनेंतर्गत बेळगावसाठी 100 बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अत्याधुनिक ई बसस्टँड निर्माण करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. पुढीलवर्षी बेळगावच्या ताफ्यात 100 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असून त्यादृष्टीने वेगाने पावले उचलण्यात येत आहेत. इलेक्ट्रिक बसेसमुळे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांचा अनुभवही घेता येणार आहे.









